मुख्य बातमी

मराठा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम

रत्नागिरी : येथील मराठा मंडळ संस्थेची स्थापना १९७५ सालात झाली असून, संस्थेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त २५ जानेवारी रोजी मराठा भवन, तारांगण समोर, जुना माळ नाका येथे सुवर्ण सुवर्ण महोत्सवी सोहळा आयोजित केला असून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गेल्या पाच दशकातील मंडळाचा प्रवास सामाजिक योगदान आणि प्रगतीचा आनंद साजरा केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष सुनीलदत्त देसाई यांनी दिली.

शहरातील मराठा भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश चव्हाण, कोषाध्यक्ष कमलाकर देसाई, कार्यवाह चंद्रमोहन देसाई, उपेंद्र सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
२५ जानेवारी रोजी सकाळी ६.४५ ते ८ यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज पूजन व मारुती मंदिर ते मराठा भवन अशी सवाद्य पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. ८ ते १०.३० यावेळेत श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर आई तुळजाभवानी मराठा महिला मंडळातर्फे भजन सादर केले जाईल. ११ ते १.३० यावेळेत सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यात स्मरणिका प्रकाशन, सत्कार समारंभ यांचा समावेश असेल. यावेळी दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे हे ‘छत्रपती शिवाजी महाराज एक महान व्यवस्थापक – शिवकालीन कृषी व्यवस्थापन व दैनंदिन जीवनातील आचरण’ या विषयावर मार्गदर्शन करतील.

दुपारी ३ ते ४ यावेळेत मराठा मंडळाच्या वेबसाईटचे उद्घाटन केले जाईल. त्यानंतर माझी भारतीय महसूल सेवा अधिकारी आणि अंमलबजावणी संचालनालयाचे निवृत्त उपसंचालक (इडी) डॉ. उज्वलकुमार चव्हाण ‘स्वप्नांच्या उंबरठ्यावरील युवक व भविष्याचा मार्ग’ या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारी ४ ते ५ यावेळेत मराठा मंडळ फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. यावेळी जागतिक विक्रमधारक लेखिका, संपादक सौ. रचना बागवे या ‘स्त्री उद्योजकतेचा उद्याचा वेध’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मराठा समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचे सत्कार, ६ ते ९.३० सांस्कृतिक विविध गुणदर्शन आणि त्यानंतर स्नेहभोजन असा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा मंडळ रत्नागिरीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!