मतदारयादीत नाव नोंदणीसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत
नवमतदारांसाठी १० व ११ ऑक्टोबरला राज्यभर विशेष शिबिरे : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आवाहन

मुंबई : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२६ आहे. नवमतदारांसह प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी १० व ११ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ घेऊन मतदारांनी अंतिम मतदार यादीत आपले नाव सुनिश्चित करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत ७ लाख १९ हजार ३८२ मतदारांनी नमुना-६ मध्ये अर्ज दाखल केले आहेत. मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्तीसाठी ३ लाख ९९ हजार ९२५ अर्ज नमुना-८ मध्ये, तर नावे वगळण्यासाठी १८ हजार ७४८ अर्ज नमुना-७ मध्ये प्राप्त झाले आहेत.
नवमतदारांना नोंदणीची संधी
१ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार तसेच अन्य पात्र असूनही प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना नमुना-६ भरून नाव नोंदविता येईल. त्यासाठी आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
हे अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने सादर करता येतील. तसेच १० व ११ ऑक्टोबर रोजी आयोजित विशेष शिबिरांमध्येही अर्ज दाखल करता येतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करता येईल.
नोटीस प्राप्त मतदारांनी कागदपत्रे सादर करावीत
मागील विशेष सखोल पुनरीक्षणातील नोंदींशी जुळवणी न झाल्यामुळे (नो मॅपिंग) किंवा जुळवणी होऊनही तार्किक विसंगती (लॉजिकल डिस्क्रिपन्सी) आढळल्यामुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनाही विशेष शिबिरांमध्ये संबंधित कागदपत्रे सादर करता येतील.
भारत निवडणूक आयोगाने नोटिशीत नमूद केलेल्या १३ प्रकारच्या कागदपत्रांपैकी आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्यास अन्य वैध कागदपत्रे किंवा दस्तऐवज सादर करता येतील. यासाठी ‘Any Other Documents’ हा पर्याय बीएलओ ॲपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मतदारांनी १२ ऑक्टोबरची अंतिम मुदत लक्षात घेऊन आवश्यक अर्ज व कागदपत्रे वेळेत सादर करावीत आणि विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.



