मुख्य बातमी

जागतिक ऑटिझम जागरुकता दिनानिमित्त आस्था सोशल फाउंडेशनकडून जनजागृती

रत्नागिरी : आज (२ एप्रिल) असलेल्या जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवसानिमित्त येथील आस्था सोशल फाउंडेशनकडून रत्नागिरी बसस्थानकात पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. स्वमग्नता अर्थात ऑटिझम म्हणजे काय आहे, हे सर्वसामान्यांना सोप्या शब्दांत व चित्रांच्या माध्यमातून कळावे यासाठी हे पोस्टर तयार करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आल्हाद सुरेखा पाथरे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘आस्था’च्या सचिव सुरेखा पाथरे यांनी ऑटिझमच्या लक्षणांची माहिती दिली. तसेच पालकांनी आपल्या मुलांमधील या लक्षणांकडे लवकरात लवकर लक्ष दिल्यास व शक्य तितक्या लवकर थेरपी, उपचार सुरू केल्यास मुलांना वयानुरूप वाढ आणि विकासाचे टप्पे गाठता येत असल्याचे सांगतानाच मूल खूप चंचल असेल, वयानुरूप बोलत नसेल, स्वतःमध्येच मग्न राहत असेल, इतर मुलांमध्ये मिसळत नसेल तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, असे सांगितले.

अशा बालकांसाठी ‘आस्था’मध्ये सर्व प्रकारचे सल्ला समुपदेशन व थेरपी उपचार उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये डीईआईसी येथे देखील मुलांसाठी सेवा उपलब्ध आहे.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या विजेता मोर्ये यांनी देखील सहभाग घेतला. ‘आस्था’च्या कार्यकर्त्यांनी ऑटिझमची माहिती देणारी पत्रके बसस्थानकात व परिसरात वितरित केले आणि ऑटिझम असलेल्या मुलांचा आपण स्वीकार करून समजून घेऊन, आधार व प्रेम देण्याची, सामावून घेण्याची आवश्यकता व्यक्त केली.

या उपक्रमात संस्थेच्या हेल्प लाईन जिल्हा समन्वयक संकेत चाळके, थेरपी सेंटर प्रमुख संपदा कांबळे, कार्यकर्ते, पालक व मुले सहभागी झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!