कोकणात ३ लाख ९६ हजार कोटींची गुंतवणूक : मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : “दावोस येथे महाराष्ट्राने अधिकाधिक गुंतवणूक मिळवण्यात यश मिळवले आहे. कोकणात ३ लाख ९६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात किती गुंतवणूक याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील,” अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
“दावोस दौऱ्याला चांगले यश आले आहे. उद्योजकांना कोकणाकडे वळवण्यात यश आले आहे. झालेल्या करारानुसार ३ लाख ९६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोकणात येईल. त्यात कोणत्या जिल्ह्यात कोणते प्रकल्प येतील, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच घेतील,” असे ते म्हणाले.
रत्नागिरी नगरपालिकेत शौचालय घोटाळ्याच्या विषयावरून अभियंता आणि उपनगराध्यक्ष यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती आपल्या कानावर आली आहे. हा अभियंता उपनगराध्यक्षांच्या अंगावर धावून गेल्याचे आपण वाचले आहे. याबाबत नगरसेवकांची चर्चा करून आपण निर्णय घेऊ, असे मंत्री सामंत म्हणाले. अभियंता उपनगराध्यक्षांच्या अंगावर धावून गेला असेल तर त्याची केवळ बदली करून भागणार नाही त्याचे निलंबन करावे लागेल. आपण या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.



