मुख्य बातमी

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या वडिलांचे देहदान

मृत्यूनंतरही वैद्यकीय शिक्षणाची सेवा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७ वे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे वडील अच्युत शिवराम आठल्ये (वय ८९, रा. गुरुराज हाउसिंग सोसायटी, उद्यमनगर, रत्नागिरी) यांचे २७ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज (२८ जानेवारी) रोजी करण्यात आले. हे या महाविद्यालयातील १७ वे मरणोत्तर देहदान आहे. तत्पूर्वी काल मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.

कै. अच्युत आठल्ये यांची सून डॉ. रश्मी आठल्ये या रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

अच्युत आठल्ये यांचे मूळ गाव शिपोशी (ता. लांजा) असून, त्यांनी एलआयसीमध्ये ४० वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. वाचनाची त्यांना अत्यंत आवड होती. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी विविध वाचनालयांना अनेक पुस्तके भेट दिली होती. समाजकार्याची आवड, साधे जीवन व विचारशील व्यक्तिमत्त्व ही त्यांची ओळख होती.

या मरणोत्तर देहदानप्रसंगी कै. अच्युत आठल्ये यांची मुलगी, जावई, नातेवाईकांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे, तसेच जिल्हा परिषद, रत्नागिरी येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ही संपूर्ण देहदान प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, राज पेडणेकर व श्रेयस जोशी यांनी देहदान प्रक्रियेत सहकार्य केले.

कै. अच्युत आठल्ये यांच्या या मरणोत्तर देहदानातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाची मदत होणार असून, त्यांचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!