मुख्य बातमी

कोकणातील कातळशिल्पांच्या संशोधनासाठी राज्य सरकारची १४ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई : कोकणात १७५ गावांत दोन हजारांहून अधिक कातळशिल्पे आहेत. या कातळशिल्पांचे गूढ शाेधून काढण्यासाठी यावर आता संशोधन केले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने १४ कोटी ६२ लाख रुपयांची तरतूद केली असून संशोधनासाठी मुंबई आणि रत्नागिरी येथील जागतिक वारसा कक्ष निर्माण केला जाणार आहे. या वारसाकक्षाच्या माध्यमातूत कोकणातील कातळशिल्पाविषयीचे संशोधन, नवीन स्थळांचा शोध आणि कातळशिल्पांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.

कोकणात समुद्रकिनाऱ्यालगत ३०० किलोमीटर अंतरावर विविध ठिकाणी कातळशिल्पे आढळतात. यापैकी बारसू येथील कातळशिल्प समूह क्र. २, चवे, देवीहसोळ आणि कशेळी ही कातळशिल्पे राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आली आहेत. युनेस्कोच्या प्रस्तावित वारसा यादीतही कातळशिल्पांचे नामांकन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आता या कातळशिल्पांच्या माध्यमातून आद्यऐतिहासिक मानव आणि त्यावेळचा काळ याचाही अभ्यास केला जाणार आहे. यासाठी जागतिक वारसा कक्ष तयार करण्यात येत असून मुंबईतील कक्षाकडे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कातळशिल्पांवरील साहित्यांचा सखोल आढावा घेणे, ऐतिहासिक नकाशे, उपग्रह प्रतिमा व अभिलेखीय साधनांचा अभ्यास करणे तसेच कातळशिल्पांचा माहितीकाेश तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. यातून कातळशिल्पांचे सर्वेक्षण, नोंदणी, वर्गीकरण व संवर्धन मुल्यांकनासाठी युनेस्को मार्गदर्शक तत्त्वांनुसार पद्धती व मानके विकसित केली जातील.

रत्नागिरी येथील जागतिक वारसा संशोधन कक्षाकडून कातळशिल्पांचे क्षेत्रीय सर्वेक्षण, स्थळ पडताळणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ड्रोनद्वारे कातळशिल्पांचे क्षेत्रीय सर्वेक्षण, जीपीएस आधारित नकाशांकन, छायाचित्रण व ड्रोनद्वारे दस्तऐवजीकरण तसेच स्थळांच्या भौगोलिक व सांस्कृतिक संसर्भांचा अभ्यास करणार आहे. त्याचप्रमाणे स्थानिक परंपरा, लेककथा व स्थाननामे यांचे संकलन, स्थळांची स्थिती व धोके यांचे मूल्यांकन, संवर्धन व संरक्षणासाठी प्राथमिक शिफारसी या कक्षाकडून दिल्या जाणार आहेत. यासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनलायाच्या संचलकांना नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!