शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिवजयंतीचा अभूतपूर्व सोहळा
'जय शिवाजी'च्या जयघोषात भव्य शोभायात्रा संपन्न

रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गुरुवारी (१९ फेब्रुवारी) अत्यंत भक्तिभावात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. तांत्रिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आपल्या महान इतिहासाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर शिवमय झाल्याचे पाहायला मिळाले.
सकाळी १० वाजता कार्यक्रमाचा मुख्य सोहळा पार पडला. संस्थेचे प्राचार्य डॉ. चं. य. सिमिकेरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण चैतन्यमय केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात शास्त्र विभागाच्या अधिव्याख्याता श्रीमती अदिती मुळ्ये यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर ओघवते भाषण केले. महाराजांनी शून्यातून स्वराज्य कसे निर्माण केले आणि त्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.
विशेषतः महाराजांनी स्त्रियांना दिलेला उच्च दर्जा आणि त्यांचा नेहमीच राखलेला सन्मान, यावर त्यांनी प्रकाश टाकला. मुळ्ये मॅडम म्हणाल्या की, “महाराजांचे चारित्र्य हे केवळ इतिहास नसून तो जीवनाचा आदर्श आहे. आजच्या तरुण विद्यार्थ्यांनी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेत स्त्रियांचा आदर आणि संरक्षण करण्याची शपथ घेतली पाहिजे.” त्यांनी शिवकालीन प्रसंगांचे दाखले देत विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला.
व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते मुख्य इमारतीपर्यंत एका भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. वाजत-गाजत निघालेल्या या मिरवणुकीत ‘हर हर महादेव’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या शोभायात्रेची शिस्त आणि उत्साह पाहून परिसरातील नागरिकांनीही विद्यार्थ्यांचे आणि संस्थेचे विशेष कौतुक केले.
या सोहळ्यासाठी महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वीतेसाठी जिमखाना उपाध्यक्ष डॉ. काने, सचिव प्रा. योगेश पवार आणि जिमखाना पदाधिकारी तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले.



