जिजाऊ संस्थेमार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच मोफत डेमो पोलीस भरती

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित जिजाऊ मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत रत्नागिरी जिल्हा मर्यादित डेमो पोलीस भरतीचे आयोजन देवरुख येथे ए. एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानात रविवारी (३० नोव्हेंबर) रोजी सकाळी ६ वाजता घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर झालेल्या १५ हजार पेक्षा जास्त जागांच्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर या डेमो भरतीचे आयोजन केले जात असून जिल्ह्यातील इच्छुक तरुणांना प्रत्यक्ष भरतीपूर्वी स्वतःचे मूल्यमापन करता यावे, त्यानंतर त्यात सुधारणा करता याव्यात जेणेकरून या भरतीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवती पोलीस प्रशासनात रुजू होतील या उद्देशानेच जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी या डेमो भरतीचे आयोजन केले आहे. या डेमो पोलीस भरतीसाठी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. कालपर्यंत या डेमो भरतीसाठी १२०० विद्यार्थ्यांची नाव नोंदणी झालेली आहे.
जिजाऊ संस्थेच्या अनिवासी मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत गेल्या १५ वर्षांत जवळपास ५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी विविध प्रशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत.
जिजाऊ संस्थेचे मोफत चालवले जाणारे एक निवासी प्रशिक्षण केंद्र पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असलेल्या झडपोली येथे सुरू आहे. याच धर्तीवर रत्नागिरी शहरात १०० विद्यार्थ्यांचे दुसरे निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा श्री. सांबरे यांचा मानस आहे. या डेमो पोलीस भरतीत पहिल्या ७० विद्यार्थ्यांना या निवासी मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश दिले जाणार आहेत. याशिवाय सध्या जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्ह्यात अनिवासी मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी, लांजा, सापुचेतळे, देवरुख, गुहागर, जाकादेवी या ठिकाणी कार्यरत आहेत.
जिजाऊ संस्था रत्नागिरी जिल्ह्यातील १२ वी पास असलेल्या १८ ते २८ वयोगटांतील युवक-युवतींना या डेमो भरतीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहे.
अधिक माहितीसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सचिव केदार चव्हाण (7208612222) आणि जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर (94232 92575) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



