कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या वर्षपूर्तीनिमित्त ओरोस येथे २८ फेब्रुवारीला काव्योत्सव

निलेश गावकर, कल्पना मलये, श्रेयश शिंदे विशेष निमंत्रित

सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या वर्षपूर्तीच्या आणि बाराव्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी (२८ फेब्रुवारी) सायंकाळी ४.३० वाजता ‘काव्योत्सव’ हे निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. निलेश गावकर (साळशी), कल्पना मलये आणि श्रेयश शिंदे (कणकवली) निमंत्रित कवी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.

‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाची स्थापना गेल्यावर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरवदिनी झाली. गेल्या वर्षभरात या व्यासपीठाने ११ मासिक कार्यक्रम आयोजित केले. ओरोस या मुख्यालयाच्या ठिकाणी साहित्यिक व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे व्यासपीठ स्थापन करण्यात आले. यावेळी २८ तारखेला बारावा आणि वर्षपूर्तीचा कार्यक्रम ‘काव्योत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

निलेश गावकर हे शेतीमातीतील कवी आहेत. पूर्णवेळ शेती व्यवसाय करणारे श्री. गावकर यांनी कोरोना काळात एकटेपणावर मात करण्यासाठी काव्यनिर्मिती सुरू केली. ते व्यासपीठीय कवी नसले तरी त्यांची अस्सल अनुभवावर आधारित कविता रसिकांना भावते. कल्पना मलये या शिक्षिका असून शैक्षणिक क्षेत्रात त्या अनेक प्रयोग करीत असतात. त्यांनी अनेक कविसंमेलनात आपली कविता सादर केली आहे. नव्या पिढीचा प्रतिनिधी आणि पत्रकार असलेला श्रेयश शिंदे हा युवा कवी कथा, लेख, नाटक, एकांकिका अशा विविध प्रकारात लेखन करतो. कॉपीराईट हा त्याचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे.

अशा तीन वेगवेगळ्या प्रकृतीच्या कवींच्या कविता ऐकण्याचा योग या कार्यक्रमात येणार आहे. २७ तारखेला अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात, त्यामुळे हा कार्यक्रम २८ रोजी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्वांना खुला असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व सर्व कवी परगावचे असल्याने कार्यक्रम वेळेवर सुरु व्हावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.

‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाने गेल्या वर्षभरात प्रा. प्रवीण बांदेकर यांचे व्याख्यान आणि कवी दादा मडकईकर यांच्या कविता, ‘मला आवडलेले पुस्तक’ यावर १० वाचकांचे मनोगत, कथाकथन, मानसोपचार तज्ञ व लेखक डॉ. रूपेश पाटकर यांची मुलाखत, कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली ‘आषाढसरी’ कविसंमेलन, युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याच्याशी गप्पा आणि चित्रकलेचे प्रात्यक्षिक, वंदन आचार्य अत्रे यांना, बालकवी: एक शापित गंधर्व, ‘पु.ल.’कित उत्सव, जंगलाचे डॉक्टर मिलिंद पाटील यांचे जंगल पुनरुज्जीवनाबाबत व्याख्यान, सुर्वे यांचे विद्यापीठ (संध्या तांबे यांचे व्याख्यान) असे विविध कार्यक्रम आयोजित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!