“नवनिर्माण”मध्ये मराठी राजभाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय आणि नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन टेकाळे यांनी केले.

मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी महाविद्यालयातील सानिया पवार, विधी कापडी, समृद्धी जाधव, ऋचा पवार, इफत ठाकूर, सलोनी भुजबळांवर या विद्यार्थिणिनी विविध कवीनी लिहिलेल्या कवितांचे वाचन केले. विद्यार्थिनी निखत मारगुंडकर हिने आपल्या सुरेल आवाजात महाराष्ट्र गीत गायले.
दरम्यान प्रमुख पाहुणे कवयित्री अमृता नरसाळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “मराठी भाषा ही आधीपासूनच समृद्ध आणि व्यापक आहे. अलीकडे महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. आपण मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे. त्याचबरोबर त्याचा दर्जा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. मराठी भाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत की, जे मराठीतच चांगले वाटतात सर्व विद्यार्थ्यांनी भाषा समजून घेण्यासाठी स्वतःला मराठी भाषेची गोडी लावून घेतली पाहिजे.”
या प्रसंगी जेष्ठ लेखक, सामाजिक कार्यकर्ते प्रा. अर्जुन जाधव म्हणाले, “मराठीत लिळा चरित्र हा मराठीतला पहिला ग्रंथ आहे खरतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठीला राज्य भाषेचा दर्जा दिला आहे हे तुम्ही विसरू चालणार नाही. अशा या मराठी भाषेचे संवर्धन, व्यापकता आजच्या युवा पिढीने वाढविले पाहिजे.”
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे म्हणाले, “मराठी भाषेतील अनेक शब्दांना पर्यायी शब्द दुसऱ्या भाषेमध्ये उपलब्ध नाहीत. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोबाईलच्या जाळ्यतून बाहेर पडून भरपूर वाचायला पाहिजे. भरपूर ऐकायला पाहिजे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबर ललित गद्य साहित्य, कविता, प्रवास वर्णन, आत्मचरित्र , कादंबरी वाचली पाहिजेत.”
दरम्यान या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनी श्रद्धा सुर्वे यांनी पु. ल. देशपांडे यांच्या ती फुलराणी मंजू या कथेवर एकपात्री केली.
या कार्यक्रमाला तुकाराम बच्चे, दत्ताजीराव अडसूळ, सागर माने, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

