पटवर्धन हायस्कूलचे ज्येष्ठ सेवक रमेश जगताप यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ उत्साहात

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ अंतर्गत कार्यरत पटवर्धन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील ज्येष्ठ सेवक रमेश जगताप यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सदिच्छा समारंभ अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तब्बल ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त सहकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन जगताप यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात पंगेरकर यांनी जगताप यांच्या सेवाभावी वृत्तीचा गौरव केला.
सत्कारमूर्तींचा परिचय शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संदीप कांबळे यांनी करून दिला. त्यांनी जगताप यांच्या आयुष्याचा जीवनपट उलगडताना त्यांचे उत्तम कबड्डीपटू, धार्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्त्व, कुशल शेतकरी व शालेय कामकाजातील अचूक ज्ञान यांचा विशेष उल्लेख केला.
भारत शिक्षण मंडळाच्या वतीने माजी उपमुख्याध्यापक रमेश पटवर्धन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्याध्यक्ष श्रीराम भावे, नितीन मोहिते, विजय वाघमारे, श्री. कदम, कृ.चि .आगाशेच्या माजी मुख्याध्यापिका शीतल काळे यांची उपस्थिती लाभली. मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर व उपमुख्याध्यापक श्री. पंगेरकर यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन जगताप यांचा सन्मान करण्यात आला.

गुरुकुल विभागामार्फत श्रीमती नाईक यांनी श्री व सौ. जगताप यांचा सत्कार केला. प्राथमिक विभाग, गुरुकुल विभाग, पटवर्धन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच बालविभागामार्फतही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. रंगभ्रमंती ग्रुप, संस्था अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विशेष सत्कार करून भेटवस्तू प्रदान केल्या.
या प्रसंगी अनेक सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. गणेश गुळवणी, वसंत आर्डे, श्री. पाटील, विजय वाघमारे, ज्येष्ठ लिपिक श्री. ताडे, श्री. सावंत आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. भारत शिक्षण मंडळाच्या वतीने विजय वाघमारे यांनी जगताप यांच्या कार्याचा गौरव केला.
मनोगत व्यक्त करताना श्रीमती प्रीती पाटणकर यांनी “मामांचे प्रेम, आपुलकी व सहकार्य कधीही विसरता येणार नाही,” असे सांगितले. श्रीमती बंडबे यांनी परीक्षा विभागातील त्यांच्या शंभर टक्के अचूक कामाची खात्री असल्याचे नमूद केले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे श्री. बर्वे यांनी “ऑफिसची सर्व माहिती असलेली व्यक्ती” असा गौरवपूर्ण उल्लेख केला.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर यांनी जगताप यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या कार्यतत्परतेची कमतरता निश्चित जाणवेल, असे सांगून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली शेट्ये यांनी केले. उत्कृष्ट नियोजन कैलास वाडकर यांनी केले. आभार प्रदर्शन अमर लवंदे यांनी केले.
भावनिक वातावरणात पार पडलेल्या या समारंभात श्री. जगताप यांच्या कार्याचा गौरव करत सर्वांनी त्यांना निरोगी, आनंदी व समृद्ध आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


