कसबा न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये २००१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

संगमेश्वर : तालुक्यातील कसबा न्यू इंग्लिश हायस्कूलमधील इयत्ता दहावी बॅच २००१ मधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १ मार्च रोजी प्रशालेमध्ये अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात पार पडला. तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विविध उपक्रम राबवले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे विद्यमान प्राचार्य श्री. शेख व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री. पटेल, श्री. गावडे, श्री. पडवळ, श्री. मोहिते व संस्थेचे शिपाई सूरज गीते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी प्रा. डॉ. प्रवीण जाधव आणि प्रशालेचे श्री. गावडे यांनी अतिशय खुमासदार शैलीत केले.
या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले जुने शिक्षक सौ. माधुरी, श्री. जाधव व श्री. बागवे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. श्री. बागवे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या पाल्यांना गणित विषयाची गोडी लागावी, यासाठी स्वतः लिहिलेल्या ‘स्पर्धा परीक्षा गणित’ या पुस्तकाच्या प्रती भेट दिल्या. सौ. माधुरी यांनी एक सुरेल गीत सादर करून विद्यार्थ्यांना स्वरमय शुभेच्छा दिल्या. श्री. मनेर व सौ. मनेर (माजी प्राचार्य) प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, तरी त्यांनी व्हाट्सअपद्वारे संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.
प्रशालेचे प्राचार्य श्री. शेख व श्री. पटेल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेला मिळालेल्या क्रीडा साहित्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंचा आलेख उंचावण्यास मोठी मदत होत आहे.”
कार्यक्रमाला स्नेहा पवार, आशिष बल्लाळ, मोहसीन बोट, सागर सुर्वे, नम्रता शेवडे, नूतन मोरे, ज्ञानदा जोशी, श्रद्धा इंदुलकर, महेश जाधव, योगेश मोहिते, अविनाश निवळकर व प्रवीण जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, जे विद्यार्थी कामानिमित्त परदेशात आहेत, त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधून कार्यक्रमाचा आनंद लुटला.p
या बॅचच्या वतीने शाळेला ‘साऊंड सिस्टम’ भेट देण्यात आली. तसेच निसर्गप्रेमी आशिष बल्लाळ यांच्या संकल्पनेतून प्रशालेच्या परिसरात फुलझाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. यावेळी रंजीता बेंडके, अक्सा खान, उपेंद्र रहाटे, अविनाश रहाटे, संदेश गानु, मुफिद मुजावर, धीरज साळवी, मझहर बागवान, विनोद पटेल, जितेंद्र बामणे, प्रमोद चिले, सचिन चव्हाण हे विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी, प्रशालेतील दिवंगत शिक्षक आणि बॅच २००१ मधील दिवंगत सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. योगेश मोहिते यांच्या सुमधुर बासरी वादनाने या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.


