पालखी भेटीने, तिन्ही बहिणींच्या गळाभेटीने रंगतो आबलोलीतील शिमगोत्सव

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथे आबलोली आणि खोडदेची ग्रामदेवता श्री नवलाई देवी यांच्या पालखी भेटीचा, तिन्ही बहिणींच्या गळा भेटीचा सोहळा रंगला. याच गळाभेटीने आबलोलीतील शिमगोत्सव उत्साहात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात आनंदाने साजरा करण्यात आला. हा सोहळा प्रत्यक्ष पाहताना डोळ्याचे पारणे फिटल्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला.
नवलाई देवींची गळाभेट होताना दोन्ही पालखींच्या आतील नारळांची आपो – आप अदलाबदल होते, अशी आख्यायिका सांगण्यात येते. आबलोली खालील पागडेवाडी येथील मानकरी रमेश गोणबरे, प्रमोद गोणबरे, राजेश गोणबरे, दिलीप गोणबरे, सुरेश गोणबरे, शंकर गोणबरे नऊ दिवस नवलाई देवीच्या नावाने श्रद्धापूर्वक कडक उपवास करतात. ते मानकरी नवलाई देवीच्या पालखी समोर सहानेवर धारदार शस्त्राने स्वतःच्या अंगावर हाणून घेतात; मात्र यावेळी कसल्याही प्रकारची इजा होत नाही, साधे खरचटतही नाही किंवा रक्तही येत नाही. एकूणच हा पालखी भेट, गळाभेट सोहळा भक्तांसाठी, भाविकांसाठी नेत्र सुख असतो.

फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सूर्योदयाबरोबर आबलोली – खोडदे येथील होम पेटवले जातात; परंतु यावर्षी ग्रहण असल्याने ३ मार्च ऐवजी ४ मार्च रोजी पहाटे ६.३० वाजता होम पेटवण्यात आले आणि दुपारनंतर आबलोली येथील नवलाई देवी, खोडदे सहानेची वाडी येथील नवलाई देवी, खोडदे गणेशवाडी येथील नवलाई देवी या तिन्ही पालख्या, तिन्ही बहिणी आपल्या लाडक्या भावाला म्हणजे गोपाळजीला भेटून आल्यानंतरच आबलोली येथील कै. दादा कारेकर यांच्या जागेतील मैदानावर नाचविण्यात येतात. याच वेळी दुपारनंतर सहाने वर जत्राही भरते.
देवींच्या दर्शनानंतर भाविक, नागरिक व लहान मुले जत्रेत खरेदी करतात. विशेष म्हणजे आबलोली येथील श्री नवलाई देवीच्या पालखीला खोडदे येथील श्री नवलाई देवीच्या पालख्या क्रमाक्रमाने भेटतात. यावेळी दोन्ही गावातील लोक आपल्या खांद्यावर पालखी वाहून नेणाऱ्या भक्तांना उचलून घेतात आणि गावातील ग्रामस्थांच्या खांद्यावर उभे असलेल्या ग्रामस्थांच्या खांद्यावरील पालख्या वाजत – गाजत ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या अतिषबाजीत एकमेकांची गळाभेट घेतात. याचवेळी पालख्यांची ही गळाभेट होते. यावेळी दोन्ही पालकांची, दोन्ही बहिणींची गळाभेट होताना आतील नारळांचीही अदलाबदल होते, अशी आख्यांकीका आवर्जून सांगितली जाते. आबलोली – खोडदे येथील पालख्यांची, दोन्ही बहिणींची गळाभेट होत असताना खोडदे येथील दुसरी पालखी एका बाजूस ग्रामस्थ नाचवीत असतात. पहिली पालखी भेटून निघून गेल्यावर दुसरी पालखी आबलोलीच्या ग्रामदेवतेला भेटते.
अतिशय शिस्तबद्ध उत्साहात हा सोहळा पार पडतो. आबलोलीतील कै. दादा कारेकर यांच्या जागेतील मैदानावर रंगणारा हा पालखी भेट, गळाभेट सोहळा आधुनिक युगातही तितकाच संस्मरणीय ठरतो आहे.


