मुख्य बातमी

सजग उमेदवारांसाठी चिपळूण, रत्नागिरीत प्र-भावी नगरसेवक मार्गदर्शन कार्यशाळा

रत्नागिरी : आगामी नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका समोर ठेवून भावी नगरसेवकांसाठी एका विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन चिपळूण व रत्नागिरीमध्ये करण्यात आले आहे. परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (चिपळूण) आणि जनजागृती संघ (रत्नागिरी) यांच्या सहयोगाने १५ सप्टेंबरला चिपळूण व १६ सप्टेंबरला रत्नागिरीत ही कार्यशाळा होईल. यात येथे नगरपरिषद /स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकांचे उद्दिष्ट ठेवून आदर्श आणि सजग निवडणूक उमेदवार घडवण्याबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी व प्रभावी लोकशाही आहे. तिच्या मजबुतीसाठी प्रत्येक निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थेची एक पायरी आहे. येथूनच खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी घडतो. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने निवडणूक प्रक्रीयेबाबत सुस्पष्ट माहिती, योग्य दृष्टीकोन व प्रभावी संवादकौशल्य यांची तयारी करूनच या स्पर्धेत उतरावे हे अत्यंत आवश्यक आहे. अशा मार्गदर्शन कार्यशाळा शहरांमध्ये होतात. परंतु सर्वच कार्यकर्त्यांना पुणे-मुंबई येथे जाऊन हे मार्गदर्शन घेणे शक्य नसते.

त्याकरिता चिपळूण, रत्नागिरीत निवडणूक आणि राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना आमंत्रित केले आहे. परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (चिपळूण) आणि जनजागृती संघ (रत्नागिरी) यांच्या सहयोगाने कार्यशाळा होणार आहे. कोणताही पक्ष असो अथवा अपक्ष ही कार्यशाळा सर्व उमेदवारांसाठी खुली असणार आहे. तज्ज्ञ व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनातून या कार्यशाळेत उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया, नामनिर्देशन प्रक्रिया, आचारसंहिता, प्रचार धोरण, जनसंपर्क तंत्र, संवादकौशल्य तसेच आधुनिक समाज माध्यमांचा वापर, खर्चाचे पारदर्शक नियोजन, प्रचार यंत्रणा आणि स्वयंसेवक व्यवस्थापन कसे करावे याची सखोल माहिती दिली जाणार आहे. कार्यशाळेत जबाबदार नेतृत्वगुण आणि मतदारांशी विश्वासार्ह नाते निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाईल.

या कार्यशाळेद्वारे विविध ठिकाणच्या तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभणार आहे. अभिनेते, लेखक, व्यवस्थापन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र तज्ञ असून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दीपक करंजीकर (मुंबई) मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक प्रचार व्यवस्थापन आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्यासोबत समन्वयक म्हणून २२ वर्षे काम करणारे तज्ज्ञ धनंजय खाडिलकर (सांगली) आणि अभियंता, वकील, राजकीय सल्लागार हृषीकेश कुलकर्णी (सांगली) मार्गदर्शन करणार आहेत.

ही कार्यशाळा १५ सप्टेंबरला अभिरुची हॉटेल, चिपळूण (https://forms.gle/3JD3ouN5aNEqjAR4A) येथे आणि १६ सप्टेंबर रोजी अंबर हॉल, टीआरपी, रत्नागिरी (https://forms.gle/FEoSeJZRTDHXe3fn6) येथे सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल. सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्याला हव्या असलेल्या शहराच्या दुव्यावर नावनोंदणी करावी, असे आवाहन परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सचिव डॉ. मीनल ओक आणि जनजागृती संघाचे अध्यक्ष केशव भट यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!