मुख्य बातमी

‘मातृवंदन, एक पेड माँ के नाम’ उपक्रमास नाणीज शाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचा उपक्रम

रत्नागिरी : येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या वतीने “मातृवंदन, एक पेड माँ के नाम” हा स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन आणि आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रप्रमुख श्री. पवार, मुख्याध्यापिका श्रीमती पाटील आणि श्री. खानविलकर यांनी उपस्थित रोटरी सदस्यांचे स्वागत केले. आपल्या मनोगतात केंद्रप्रमुख पवार सरांनी शासनाच्या “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेचे महत्त्व विद्यार्थी आणि उपस्थितांना पटवून दिले.

या प्रसंगी उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला ‘कल्पवृक्ष’ म्हणून ओळखले जाणारे नारळाचे एक रोप भेट देण्यात आले. तसेच, शाळेच्या आवारात प्रतिनिधिक स्वरूपात दोन नारळाच्या झाडांचे रोपण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी मिळालेल्या रोपाला आपल्या आईचे नाव दिले आणि त्याचे केवळ संगोपनच नव्हे, तर नियमित जतन व संरक्षण करण्याची भावनिक शपथ घेतली. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावुक व अविस्मरणीय ठरला.

रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप करे यांनी या उपक्रमामागील भूमिका मांडताना सांगितले की हा उपक्रम रोटरीच्या “Create Lasting Impact” या संकल्पनेला साजेसा आहे. आज लावलेली ही नारळाची झाडे केवळ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नाहीत, तर आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आणि पुढील अनेक पिढ्यांपर्यंत टिकणारी , जिवंत आठवण ठरणार आहेत.

या प्रसंगी रोटरी क्लबचे चार्टर मेंबर्स रोटे. राजेंद्र (दादा) कदम आणि रोटे. हिराकांत साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि रोटरी सदस्यांच्या एकत्रित सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. उपक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!