डीएलएड प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
२६ मेपासून प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

रत्नागिरी : बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने नुकतेच डीएलएड प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २६ मेपासून डीएलएड प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील चार डीएलएड महाविद्यालयांमध्ये तयारीला वेग आला आहे.
कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डीएलएड प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार २६ मे ते १० जून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, २६ मे ते ११ जून ऑनलाईन अर्जाची पडताळणी, १६ जून हरकत व आक्षेप निरसन, १८ जून रोजी गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करणे, १९ जून रोजी प्रथम प्रवेश फेरी प्रसिध्द करणे, १९ ते २३ जून या कालावधीत पहिल्या प्रवेश फेरीतील प्रवेश देणे, २४ जून रोजी दुसऱ्या फेरी, २६ ते ३० जून रोजी दुसऱ्या प्रवेश फेरीतील प्रवेश देणे, ३ जुलै तिसरी प्रेवश फेरी, ३ ते ७ जुलै तिसऱ्या प्रवेश फेरीतील प्रवेश देणे अशी प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी आणि राजापूर येथे अनुदानित कनिष्ठ अध्यापक महाविद्यालय असून खेड आणि सावर्डे येथे विनाअनुदानित अध्यापक महाविद्यालये आहेत.
दरम्यान, मराठा मंदिर मुंबई संचलित स. रा. देसाई अध्यापक विद्यालय रत्नागिरी या शासनमान्य अनुदानित डीएल्.एड्.(डी एड.) काॅलेज मध्ये प्रवेश कोटा फक्त चाळीस (४०) विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे. प्रवेशासाठी १० वी गुणपत्रक व प्रमाणपत्र,१२ वी गुणपत्रक,शाळा सोडल्याचा दाखला,जात प्रमाणपत्र (मागाससंवर्ग ),नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र (एनटी, ओबीसी, एसबीसी),आधारकार्ड नंबर, मोबाईल नंबर, इमेल आयडी नंबर,रंगीत २ फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
दरम्यान, डीएडबरोबर बीए आणि बीकॉम करण्याची संधी सुद्धा रत्नागिरी येथील अध्यापक विद्यालयात विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. डीएड आणि बीए किंवा बीकॉम हे दोन्ही कोर्सेस एकाचवेळी करण्याची संधी तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेने आणि अध्यापक विद्यालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉ. विक्रांत रावराणे (मो.नं.९४२३२९२७२३) यांच्याशी संपर्क साधावा.


