‘देसाई बंधू आंबेवाले’ यांची नैसर्गिक पेये बाजारात दाखल
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लाँचिंग : अमेरिकेतही होणार निर्यात

रत्नागिरी : कोकणच्या हापूस आंब्याचा गोडवा जगभर पोहोचवणाऱ्या पावस येथील ‘देसाई बंधू आंबेवाले’ यांनी आता प्रक्रिया उद्योगात झेप घेत आपली नवीन नैसर्गिक पेये बाजारात दाखल केली आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या उत्पादनांचे अधिकृत लाँचिंग करण्यात आले. हे पेय १ एप्रिलपासून उपलब्ध होणार असून अमेरिकेला निर्यात केले जाणार आहे.

पाली (ता. रत्नागिरी) येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी देसाई बंधू आंबेवाले परिवारातील आनंद देसाई, अमर देसाई, रोहन देसाई यांच्यासह सुदेश मयेकर उपस्थित होते. कोकणातील हापूस आंबा आणि कोकम यांवर प्रक्रिया करून कोणतीही रसायने न वापरता ही पेये तयार करण्यात आली आहेत. पालकमंत्री सामंत यांनी यावेळी देसाई परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक करताना, स्थानिक फळप्रक्रिया उद्योगामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे नमूद केले. बाजारात उपलब्ध असणाऱ्या शीतपेयांमध्ये कृत्रिम रंग आणि प्रिझर्व्हेटिव्हजचा मोठा वापर असतो. मात्र, देसाई बंधू यांनी ‘१०० टक्के नॅचरल’ या सूत्राचा अवलंब करून उत्पादने ग्राहकांसाठी आणली आहेत. त्यात हापूस मँगो ड्रिंक, हापूस मँगो विथ टिडबिट्स (फळांच्या तुकड्यांसह), कैरीचे पन्हे, अमृत कोकम ड्रिंक यांचा समावेश आहे. या पेयांमध्ये कोणताही कृत्रिम रंग, जादाचे फ्लेवर्स किंवा हानिकारक केमिकल्सचा वापर केलेला नाही, हे या उत्पादनांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
‘देसाई बंधू आंबेवाले’ यांनी गुणवत्तेच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे. आता नवीन पेयांच्या माध्यमातून त्यांनी पर्यटकांना आणि आरोग्यप्रेमी ग्राहकांना एक उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ही पेये बाजारात आल्याने ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे नवीन पेय बाजारात आणण्यासाठी जयंत देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले, तर आकाश देसाई, आर्य देसाई, तनया देसाई, रोहन देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.



