आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना कोकणचा बालेकिल्ला हे सर्वांना दाखवून द्या
उद्धव ठाकरे यांचा बाळ माने यांना सल्ला : मातोश्रीवर घेतली भेट

मुंबई : ठाकरे शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झालेल्या माजी आमदार बाळ माने यांनी काल (९ जून) मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका निवडणुकांमध्ये कोकण हा ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे सर्वांना दाखवून द्या, असा आशीर्वादही त्यांना ठाकरेंनी दिला.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणात ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरीमध्ये ठाकरे सेनेची एकमेव जागा गुहागरमध्ये निवडून आली. या निवडणुकीमध्ये शिवसेनेने चांगलीच लढत दिली. अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये महाविकास आघाडीला जिल्ह्यात अगदी कमी मतांची पिछाडी मिळाली होती. त्यामुळे पुढील निवडणुकीत ठाकरे सेना व महाविकास आघाडी हे जि.प. गट व पं.स. गण राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी हे शिंदेसोबत शिवसेनेत गेल्याने उपनेतेपद रिक्त झाले होते. भविष्यातील निवडणुका लक्षात घेत आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळ माने यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी मिळाल्यानंतर बाळ माने यांनी सोमवारी ठाकरे यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली व त्यांचे अशीर्वाद घेतले.
यावेळी पुन्हा एकदा कोकणात शिवसेना फडकवण्यासाठी आशीर्वाद त्यांना देण्यात आला. यावेळी बाळ माने यांच्यासोबत मिहीर माने, खासदार संजय राऊत उपस्थित होते. खा. राऊत यांनीही बाळ माने यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


