राजापुरातील बंजारा समाजाचा तांडा वस्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल : आमदार किरण सामंत

राजापूर : “कष्टकरी अशी ओळख असलेला बंजारा समाज सर्वदूर पसरलेला आहे. राजापूर तालुक्यात नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच भागात असलेल्या या समाजाचे प्रश्न आणि समस्या सोडविणे हे आमचे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्यच आहे. त्यामुळे भविष्यात या समाज बांधवांचे प्रश्न सोडवितानाच राजापुरातील बंजारा समाजाचा तांडा वस्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल,” अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली.
राजापूर बंजारा बहुउद्देशीय समाज सेवा संघाच्या वतीने २८७ व्या संत सेवालाल महाराज जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सामंत बोलत होते.
शहरातील गुजराळी येथील पाटील मळा येथील यशोदिन सृष्टी हॉलमध्ये बंजारा बहुउद्देशीय समाज सेवा संघाचे अध्यक्ष धनसिंग मानू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यकमाला व्यासपीठावर नगरसेवक ॲड. जमीर खलिफे, राजापूर तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार, रवींद्र नागरेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुवळेकर, कल्याणी रहाटे, जिल्हा बँक संचालक महेश खामकर, पंचायत समिती सदस्य भाग्यश्री लाड, भरत लाड, प्रा. मारूती कांबळे, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, सचिव राजेंद्र बाईत, समाजसेविका माधवी हर्डीकर, ठेकेदार रविकांत भामत आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन , संत सेवालाल महाराज यांचे प्रतिमा पूजन व धनसिंग चव्हाण यांच्या हस्ते होमहवन (भोग) करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत सत्कार धनसिंग चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. चव्हाण यांनी प्रास्ताविक करून बंजारा समाजाचे स्वप्न असलेले संत सेवालाल भवन तालुक्यात उभे करण्याचे काम लवकरच मार्गी लागेल. त्यासाठी सर्वांचे सहकार्याची आवश्यकता आहे. आपला समाज हा कष्टकरी आहे. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपण कष्ट करत असतो. मात्र समाजाने आपले प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. एकत्र येवून आपले प्रश्न सोडविले पाहिजेत असे सांगितले.
सकाळच्या सत्रात संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेसह जकात नाका ते यशोदीन सृष्टी सभागृह अशी भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष ईश्वर राठोड, अर्जुन राठोड, उमेश उडेद, लक्ष्मण राठोड, सुरेश राठोड, नामदेव राठोड, काशिनाथ राठोड, बळीराम जाधव, विलास राठोड, रेखू जाधव, संजय चव्हाण, सचिन राठोड यांसह बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.


