पुस्तकांमुळेच आपण मोठे होतो: जिल्हाधिकारी मनुज जिंदल
जिल्हा ग्रंथोत्सवाचे उत्साहात उद्घाटन

रत्नागिरी : “पुस्तकांमुळेच आपण मोठे होतो आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी वाचकांना पुन्हा ग्रंथालयांकडे वळवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि पुस्तकांकडे वाचकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित दोन दिवसीय रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव २०२५ चे उद्घाटन जिल्हाधिकारी जिंदल यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जिंदल यांनी यावेळी वाचनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी स्वतःच्या शालेय जीवनातील आठवणी सांगत त्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल माहिती दिली.
ग्रंथोत्सवाचा प्रारंभ मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अशा भव्य ग्रंथदिंडीने झाला. या दिंडीचे पूजन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे, लेझीम पथक आणि ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोठ्या संख्येने विद्यार्थी, वाचक आणि ग्रंथप्रेमी या दिंडीत सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे संचालक रवींद्र कालेकर यांनी ग्रंथालये समाजाला नवी दिशा देण्याचे काम नियमितपणे करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी ग्रंथालय सेवकांचे कौतुक करत ग्रंथालये ही केवळ वाचनालये न राहता संस्कृतीचा ठेवा जपणारी ‘संग्रहालये’ व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. महेश सोनजे (ग्रंथालय संचालनालय, मुंबई) यांनी पालकांनी स्वतः वाचन करून मुलांसमोर आदर्श ठेवावा, जेणेकरून मुले मोबाईल सोडून वाचनाकडे वळतील, असा सल्ला त्यांनी दिला.
माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे वाचनाने मनुष्य प्रगल्भ होतो, असे सांगत त्यांनी एका ग्रंथालयावर आधारित लेखाचे वाचन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विलास कुवळेकर यांनी आपल्या भाषणात मायबोली मराठीचे विविध अंग आणि साहित्यिकांची माहिती देत, काव्यपंक्तींच्या माध्यमातून श्रोत्यांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय निरीक्षक हेमंत काळोखे यांनी केले. आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक यांनी मानले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विभावरी जोईल, भास्कर झोरे तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे सुधाकर वाघ, विजय आम्रे आणि वैष्णवी शिवगण यांनी विशेष परिश्रम घेतले.



