मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापुरात गारांचा पाऊस

राजापूर : तालुक्याच्या पूर्व भागात काल (२६ मार्च) अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर वातावरणात झपाट्याने बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला.

तालुक्यातील ओणी, वाटूळ, जांभवली आदी गावांमध्ये पावसासोबत गारांही कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे शेतकरी व बागायतदार चिंतेत सापडले असून मोठ्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः आंबा, काजू तसेच भाजीपाला पिकांवर गारपिटीचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

गारांच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या असून कच्च्या आंब्यांची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. त्यामुळे हंगामाच्या तोंडावरच बागायतदारांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. काही भागात वीजपुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!