मुख्य बातमी

एप्रिल महिन्यात विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन

रत्नागिरी : हवामानातील वाढती अनिश्चितता आणि शेतीचा वाढता खर्च यावर मात करण्यासाठी ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’अंतर्गत जिल्ह्यात विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.

या मोहिमेची पहिली शेतीशाळा १ एप्रिल रोजी होणार असून, यामध्ये पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे व त्यावर टोकण करणे, शून्य किंवा कमीत कमी मशागत, आंतरपीक पद्धत, बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रिया या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. त्यानंतर ८ एप्रिल रोजी होणाऱ्या दुसऱ्या शेतीशाळेत जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन, ज्यामध्ये बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आणि ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व त्यांच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली जाईल.

पुढील टप्प्यात १५ एप्रिल रोजी तिसरी शेतीशाळा पार पडेल, ज्याचा मुख्य विषय ‘एकात्मिक कीड व्यवस्थापन’ हा असेल. यामध्ये सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र कीटकांचे संवर्धन आणि अर्कांचा वापर यावर भर दिला जाईल. मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात २२ एप्रिल रोजी चौथी शेतीशाळा आयोजित केली असून, यात भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र, भाताची थेट पेरणी (DSR), ‘श्री’ पद्धत आणि भात लावणीसाठीच्या यांत्रिकी पद्धतींविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

या सर्व शेतीशाळांचे थेट प्रक्षेपण नमूद तारखांना सायंकाळी ७:३० वाजता कृषी विभाग, पाणी फाऊंडेशन आणि उमेदच्या यू ट्युब चॅनेलवर, तसेच ‘महाविस्तार एआय’ ॲपवरील ‘सीआरटी विशेष अभियान’ या सत्रांतर्गत केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!