मुख्य बातमी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणतर्फे १ ते १० मे दरम्यान बालनाट्य शिबिर

चिपळूण : आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालनाट्य शिबिराचे तिसरे वर्ष उत्साहात आयोजित करण्यात आले असून, हे शिबिर दि. १ मे ते १० मे या कालावधीत पार पडणार आहे. बालकांमधील अभिनय, वक्तृत्व, संवादकौशल्य, आत्मविश्वास, रंगभूमीची आवड आणि सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये मुलांना नाट्याभिनय, संवादफेक, आवाजाचा वापर, देहबोली, रंगमंचावरील वावर, समूह सादरीकरण, व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध कलात्मक व उपयुक्त घटकांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

यंदाच्या शिबिरासाठी प्रवेश मर्यादित असल्याने नियमितपणे शिबिरात सहभागी होणाऱ्या मुलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक पालकांनी पुढील दोन दिवसांत आपल्या मुलांची नावनोंदणी करून प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिबिराच्या वेळापत्रकाबाबत माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, १ मे रोजी शिबिराची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ अशी राहणार आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत शिबिराचे सत्र होणार आहे. गेल्या दोन वर्षांत या बालनाट्य शिबिराला चिपळूण व परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अनेक मुलांनी या शिबिरातून रंगभूमी, अभिनय आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आपली कला खुलवली आहे. त्यामुळे यंदाच्या तिसऱ्या वर्षीही या शिबिराबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

बालकांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्यात सांस्कृतिक जाण निर्माण व्हावी आणि रंगभूमीशी त्यांचा जवळचा संबंध निर्माण व्हावा, या उद्देशाने हे शिबिर सातत्याने राबवले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणीसाठी ॲड. विभावरी रजपूत (7796729587) व दिलीप आंब्रे (82910 89302) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!