केंद्र शासन पुरस्कृत “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम”
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी संपन्न

रत्नागिरी : केंद्र शासन पुरस्कृत, उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मध्ये उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २९ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यातील यू-डायस प्राप्त शाळांमध्ये पार पडली. ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, ऊर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली या नऊ माध्यमातून घेण्यात आली.
उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असाक्षरांना साक्षर करण्यासाठी अंमलबजावणी केली जात आहे. या परीक्षेतून निकषानुसार परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून नवसाक्षरांना प्रमाणपत्र व गुणपत्रक एकत्रित देण्यात येणार आहेत. या चाचणीच्या माध्यामातून व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण ही जीवन कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे व त्या अनुषंगाने त्यांचे पुढील जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
२१ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या परीक्षेत सुमारे ५ लाख असाक्षरांनी ही परीक्षा दिली होती. तर केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात २९ मार्च रोजी नव्याने सुमारे १.२३ लाख इतक्या असाक्षर व्यक्तींनी नोंदणी केली. त्यापैकी संपूर्ण राज्यात सुमारे १ लाख असाक्षर व्यक्तींनी तर जिल्ह्यात एकूण ६४२ असाक्षरांनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा दिली. यामध्ये जिल्ह्यातील ५२५ स्त्रिया व ११७ पुरुष यांनी परीक्षेत सहभाग नोंदवला.
या परीक्षेसाठी राज्याचे शालेय शिक्षण विभागचे मंत्री दादाजी भुसे व शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुभेच्छा दिल्या. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांनी असाक्षरांना परीक्षा देवून नव साक्षर होण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण आयुक्त यांनी देखील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परीक्षा निरीक्षक म्हणून सर्व जिल्ह्यांमध्ये राज्यस्तरावरील सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक, उपसंचालक यांनी भेटी देण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर भेटी देवून परीक्षांचे निरीक्षण केले व परीक्षा घेणाऱ्या सर्व यंत्रणांना प्रोत्साहन दिले. जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिनस्त अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य/योजना), प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख व जिल्हास्तरावरील विविध विभागातील अधिकारी यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षा कामकाजाची पाहणी केली. केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय स्तरावरून परीक्षा केंद्रांना भेट देणारे परीक्षा निरीक्षक व अधिकारी, राज्यातील सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या नामांकित वृत्ताद्वारे परीक्षेच्या अनुषंगाने प्रसिद्धी देवून कार्यक्रमाचा प्रसार-प्रचार केला. तसेच राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी परीक्षेचे आयोजन करून परीक्षेचे कामकाज यशस्वी केले, याबाबत शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील, यांनी या सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.


