मुख्य बातमी

अवघ्या २४ तासांत खुनाचा गुन्हा उघड

चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन आरोपी जेरबंद

चिपळूण : तालुक्यातील रामपूर शिवारातील दरीत झाडाझुडपांमध्ये संशयास्पदरीत्या जळालेल्या मानवी अवशेषांचा शोध लागल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत खून व पुरावा नष्ट करण्याचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत चिपळूण पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

२८ मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रामपूर येथील डॉ. रावराणे यांनी त्यांच्या आंब्याच्या बागेजवळील दरीत काहीतरी संशयास्पद जाळल्याचे आणि त्या ठिकाणी लहान आकाराची हाडे पडलेली असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना दिली. माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, तेथे जळालेल्या स्वरूपातील अवशेष, हाडांचे तुकडे, अंगठी, रिंग व इतर वस्तू आढळून आल्या.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अधिक स्टाफ, मोबाईल फॉरेन्सिक पथक घटनास्थळी बोलावून घेतले. यासोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले, अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी आणि पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले.

जप्त केलेल्या हाडांच्या तुकड्यांबाबत कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतला असता ती मानवी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाकडे खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या गंभीर गुन्ह्याच्या दृष्टीने तपास सुरू केला. त्यानुसार चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३(१), २३८(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती, स्थानिक पडताळणी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे घटनास्थळाशी संबंधित माहिती गोळा केली. तपासात घटनास्थळाची जागा विशाल विजय खोडदेकर (वय २८, रा. रामपूर, ता. चिपळूण) याच्या मालकीची असल्याचे समोर आले. तो फरार असल्याचेही निष्पन्न झाले. याच दरम्यान मालाड पोलिसही त्याचा शोध घेत चिपळूणला आले होते, ही बाब समजताच पोलिसांचा संशय अधिक बळावला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत, म्हणजेच ३१ मार्च रोजी रात्री १०.५० वा. चिपळूण पोलिसांनी विशाल खोडदेकर याला अटक केली. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात त्याची मैत्रीण जन्नतुनिसा जिन्नत खान (रा. मालाड, मुंबई) हिचाही सहभाग असल्याचे समोर आल्याने तिलाही १ एप्रिल रोजी सकाळी १०.३५ वा. अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गुन्ह्यामागील संपूर्ण पार्श्वभूमी, हेतू आणि अन्य शक्य तितके धागेदोरे तपासले जात आहेत.

या प्रकरणात संशयास्पद जळालेल्या अवशेषांपासून सुरू झालेला तपास, वैज्ञानिक पुरावे, गोपनीय माहिती आणि जलद कारवाईच्या जोरावर अल्पावधीत आरोपींपर्यंत पोहोचण्याची कामगिरी चिपळूण पोलिसांनी करून दाखवली. त्यामुळे चिपळूण पोलिसांच्या दक्षता, समन्वय आणि तपासकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!