मुख्य बातमी

जिल्ह्यात १८ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ४ एप्रिल रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १८ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ वा प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश प्र.अपर जिल्हादंडाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आगामी काळात सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनातर्फे त्यांच्या निरनिराळ्या मागण्यांच्या तसेच विषया संदर्भात पुढीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ५ एप्रिल रोजी ईस्टर संडे, ११ रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती, १२ रोजी पारसी आदर मासारंभ, १३ रोजी वरुथिनी एकादशी आणि १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे विविध कारणांसाठी जिल्ह्यातील नागरिकांकडून आपल्या विविध मागण्यासाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काही वैयक्तीक कारणांमुळे जातीय तणावाच्या घटना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू शकते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहेत.

प्रतिबंधात्मक कालावधीत शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे, इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.

अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.

प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करायचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!