कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

आंबा बागायतदार शेतकऱ्यांचा एल्गार लवकरच वर्षा निवासस्थानावर

देवगडला आंबा, काजू बागायतदार व शेतकरी महासंघातर्फे (सिंधुदुर्ग) एल्गार मेळावा

देवगड : राज्य सरकारने आंबा बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून वाऱ्यावर सोडले आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर आंबा बागायतदार शेतकऱ्यांचा एल्गार दाखवून राज्य सरकारला गुडघे टेकायला लावणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी देवगड येथे झालेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या एल्गार सभेत केली.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, एकीकडे नाशिकच्या कुंभमेळ्याचे बजेट दोन महिन्यांत २५ हजार कोटींवरून थेट ३५ हजार कोटींवर नेले जाते, गरजेचे नसलेल्या ‘शक्तीपीठ महामार्गा’साठी ८६ हजार कोटींवरून १ लाख कोटींपर्यंत तिजोरी खुली केली जाते, मग महाराष्ट्राचा कणा असलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यासाठी सरकारकडे पैसा का नाही? मुख्यमंत्र्यांना मोठ्या प्रकल्पातून हजारो कोटी रूपयाचा ढपला पाडण्यासाठी लाखो कोटी उपलब्ध होतात; मात्र घाम गाळणाऱ्या बागायतदाराला हेक्टरी फक्त २२ हजार रुपये? ही मदतीची रक्कम म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ अशी अवस्था आहे.

आज एका हेक्टरमध्ये आंबा बागेची मशागत, कीटकनाशकांची फवारणी आणि मजुरीचा खर्च लाखांच्या घरात जातो. बदलत्या हवामानामुळे मोहोर गळणे आणि फळगळतीमुळे बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत २२ हजार रुपये देऊन सरकार नेमके काय साध्य करू पाहत आहे? या रकमेत एका झाडाचा वार्षिक देखभाल खर्चही निघत नाही, हे सरकारला समजत नाही का?

माजी आमदार बाळ माने बोलताना म्हणाले की, गेल्या महिन्याभरापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी मेळावा, मोर्चे, रास्ता रोको या माध्यमातून शेतकरी आंबा बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रुपये मदतीच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने करत आहे. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना संघटीत करून पुढील आठवड्यात १८ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे शेतकरी मेळावा घेऊन मुंबई येथील मोर्चाची घोषणा करून राज्य सरकारला गुडघे टेकायला भाग पाडण्याचा संकल्प आजच्या एल्गार मेळाव्यात आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी केला आहे.

यावेळी प्रगतशील आंबा बागायतदार सुधीर जोशी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, सुशांत नाईक, गणेश गावकर, काका ढोके, किरण टेंभुलकर, प्रशांत शिंदे, अजय तेली, तुषार पालेकर, सागर जोईल, देवगड तालुका आंबा बागायतदार संघाचे पदाधिकारी व आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!