रत्नागिरीत ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थान आणि पतितपावन मंदिर संस्था यांची गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रा

रत्नागिरी : शहरात ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थान आणि पतितपावन मंदिर संस्था आयोजित गुढीपाडव्यानिमित्त स्वागतयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यात्रेचे यंदा २१ वे वर्ष होते. रस्त्यांवर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, भगव्या पताका, सजावट, पारंपरिक वेशभूषेत हिंदू बंधू-भगिनी सहभागी झाले. रत्नागिरी शहराचे वातावरण भगवेमय झाल्याचे पाहायला मिळाले. जवळपास ५० हून अधिक चित्ररथ यामध्ये सहभागी झाले. भल्या मोठ्या हनुमंताच्या सजीव देखाव्याला प्रतिसाद मिळाला.

रविवारी सकाळी श्री देव भैरी जुगाई नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर संस्था, श्री पतितपावन मंदिर संस्थेच्या वतीने ग्रामदेवता मंदिर ते समाजमंदिरापर्यंत स्वागतयात्रेला सुरवात झाली. त्याच वेळी शहरातील मारुती मंदिर येथूनही चित्ररथ निघाले. दोन्ही यात्रा जयस्तंभ येथे एकत्रित झाल्या. मार्गावर दुभाजकावर गुढ्या व भगवे ध्वज उभारण्यात आल्या होत्या. यात्रेची समाप्ती श्री पतितपावन मंदिर येथे झाली. त्यावेळी हिंदुत्वाचा शपथ घेण्यात आली.

यात्रेमध्ये विविध प्रकारचे चित्ररथ सजवण्यात आले होते. त्यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरला तो भव्य रूपातला श्री हनुमान. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा केलेला वध हा सजीव देखावा लक्षवेधी ठरला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, नगारा, प्लास्टिकमुळे गायींच्या जीवनावर होणारे दुष्परिणाम दाखवणारा देखावा, श्री सिद्धिविनायक चक्रीभजन मंडळ, श्री काशी विश्वेश्वर देवस्थान, राष्ट्रीय सेवा समिती, संस्कृत भारती, कलारंग निर्मित गर्जतो महाराष्ट्र, मरुधर विष्णू समाज, अरुअप्पा जोशी स्मृती चित्ररथ, श्रीमान भागोजीशेठ कीर प्रतिमा, श्रीराम मंदिर मारुतीराया रथ, इलेक्ट्रिक व्यापारी संघ, पतंजली योग समिती, श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडनाईट- रक्तदानाचे महत्त्व, खल्वायन संस्था, स्वयंभू श्री काशीविश्वेश्वर देवस्थान, कॅपसन (कोटा) इन्स्टिट्यूट, नाभिक प्रशिक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण, टू व्हीलर मोटार मेकॅनिक असोसिएशन, विश्व हिंदू परिषद, नर्सिंग कॉलेज- महिला शक्ती, विठ्ठल मंदिर संघ, ब्राह्मण जागृती सेवा संघ, खालची आळी यांचा स्वच्छता चित्र रथ यांनीही सहभाग घेतला. शिवरुद्रा ढोल पथक, ब्रह्मनाद ढोल पथक, शिवगर्जना ढोल पथकांनी सर्वांची वाहवा मिळली.

रत्नागिरी जिल्हा हिंदू कटबू समाज व भ. वि. जाती जमाती कल्याणकारी संघ, भारत माता चित्ररथ, बालरंगभूमी परिषद, स्वामी समर्थ सेवा सांस्कृतिक अध्यात्मिक संस्कार केंद्र, संस्कृत भारती, संस्कार भारती, क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी राजस्थान क्षत्रिय संघ, पांचाळ सुतार समाज मंडळ, हिंदु जनजागृती समिती, पाटीदार सनातन समाज, अशा विविध संघटनाचे चित्ररथांचा या स्वागत यात्रेमध्ये समावेश होता. श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्ना सुर्वे, सर्व विश्वस्त मंडळी, मनु गुरव, पतितपावन संस्थेचे उन्मेष शिंदे, माजी आमदार राजन साळवी, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी प्रमुख उपस्थित होते.

आरोग्यम् धनसंपदा म्हणजे आपण तंदुरुस्त राहण्यासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा अनोखा चित्ररथ लक्षवेधी ठरला. यामध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने किड्स सायक्लोथॉन ४ मे रोजी जाहीर केली आहे. सलग तिसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोथॉन होणार आहे. तसेच सूवर्णसूर्य फाउंडेशनने पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनसाठी एक धाव मराठी भाषेसाठी अशी संकल्पना मांडली आहे. तसेच गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनही होणार आहे. सायकलिंग व धावणे या स्पर्धांची माहिती यावेळी देण्यात आली. धावनगरी रत्नागिरीद्वारे तंदुरुस्तीचा संदेश या वेळी देण्यात दिला.




