मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पडवे गावाच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विलास गडदे यांची नियुक्ती

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पडवे येथील निर्मल ग्रामपंचायतची तहकूब १५ ऑगस्टची ग्रामसभा सरपंच मुजीब जांभारकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात नुकतीच संपन्न झाली.

सभेच्या सुरुवातीला इतिवृत्त आणि जमाखर्चाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर ग्रामसेविका सौ. पाटील यांनी ग्रामपंचायतीमधील विविध विकासकामांचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांवर आणि विकासकामांविषयी सरपंच जांभारकर यांनी सविस्तर उत्तरे देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर अजेंड्यानुसार आजच्या सभेत नवीन तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून विलास गडदे यांची एकमुखाने निवड करण्यात आली.

श्री. गडदे हे परिसरात सर्वांच्या अडी-अडचणीला तत्परतेने धावून जाणारे तसेच सर्वांशी सलोख्याचे संबंध जपणारे म्हणून परिचित आहेत. त्यांच्या निवडीचे सरपंच मुजीब जांभारकर आणि ग्रामस्थांनी स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी तरुण उत्कर्ष मंडळ  पडवेच्या वतीने ग्रामसभेमध्ये गणेशोत्सवात ग्रामस्थ आणि महिला यांना त्रास होऊ नये म्हणून गावात  सौर उर्जा दीप गावा मधे बसवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच मुजीब जांभारकर यांनी तात्काळ मंजुरी देऊन तशी उपलब्धता करून दिली. त्यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत केले गेले.

या सभेला ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खातू, शमा मखजनकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गडदे, पोलीस पाटील अनंत गांधी, सुमेध सुर्वे, अमानत जांभारकर, विनायक भोसले, पराग कोळवणकर, सचिव नईम मखजनकर, ओंकार गडदे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!