
चिपळूण : शहरातील प्रलंबित विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २९ एप्रिल रोजी चिपळूण नगरपालिकेत धडक देत आक्रमक भूमिका घेतली. शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संजय जाधव यांची भेट घेऊन विविध मागण्यांची निवेदने सादर केली.
बहादुरशेख नाका टेलिफोन एक्सचेंज ते वांगडे मोहल्ला उर्दू शाळा दरम्यानचा मंजूर रस्ता अर्धवट ठेवण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या रस्त्याअभावी नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. तसेच, महानगर गॅस कंपनीच्या पाइपलाइन कामानंतर शहरातील अनेक रस्त्यांवर उघडे खड्डे ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीने आगाऊ रक्कम भरूनही नगरपरिषदेकडून दुरुस्ती न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
रम्बलर स्ट्रीप कामातील दिरंगाईचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. करारानुसार ६० दिवसांत पूर्ण होणारे काम मुदतवाढ मिळूनही रखडल्याने संबंधित ठेका रद्द करून नव्याने निविदा काढण्याची मागणी करण्यात आली.
मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सर्व बाबी गांभीर्याने घेत संबंधितांना नोटिसा बजावणे, आवश्यक तेथे ठेके रद्द करणे आणि कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, कामे तातडीने पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.



