खरवते येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतले alambi उत्पादन

आबलोली : चिपळूण तालुक्यातील खरवते – दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय या महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून व्यावसायिक दृष्टिकोनातून अळंबी उत्पादन घेण्यात आले आहे. अळंबी उत्पादन कोकणासाठी रोजगार निर्मितीचे साधन ठरेल, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत हा प्रकल्प या विद्यार्थ्यांकडून राबविण्यात आला आहे. कोकणामध्ये कृषीपूरक व्यवसायांची व्याप्ती वाढली पाहिजे. उद्योगशील तरुण वर्ग, महिला स्वयं सहाय्यता गट, बचत गट यांनी पुढाकार घेऊन कमी श्रम व खर्चामध्ये उपलब्ध संसाधनांचा पुरेपुर वापर करून हा व्यवसाय करत भरघोस उत्पादन घ्यावे, या उद्देशाने या विद्यार्थ्यांकडून अळंबीच्या विविध जातींचे महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील प्रयोगशाळेतून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.
महाविद्यालयाच्या २५×१५ आकाराच्या दोन बंदिस्त खोल्यांमध्ये हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. यामध्ये सेंद्रिय व रासायनिक अश्या दोन्ही पद्धती वापरून योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाबरोबरच कमीत कमी संसाधनांमध्ये चार प्रकारच्या आळंबीचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे हा प्रकल्प रोजगाराचे उत्तम साधन ठरेल हे सिद्ध झाले आहे.
या विद्यार्थ्यांकडून अळंबीच्या प्युरटेस फ्लोरिडा, ब्लु आॅईस्टर, प्युरटेस साजर कॅजु व पिंक मशरूम्स या जातीचे सुमारे ६० किलो उत्पादन घेण्यात आले आहे. सध्यस्थितीत अळंबीचा बाजारभाव हा प्रती किलो ५०० रुपये असून, या विद्यार्थ्यांना या प्रकल्पामधून चांगला नफा होताना दिसत आहे.

चिपळूण परिसरातील हाॅटेल व्यावसायिकांकडून विद्यार्थ्यांनी उत्पादित केलेल्या या आळंबीला मोठी मागणी आहे. या उत्पादनासाठी लागणारा ‘स्पाॅन’ हा प्रमुख घटक विद्यार्थ्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून मागवले असून, भविष्यामध्ये शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतूनच हे स्पाॅन कसे तयार होतील यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या हे चतुर्थ वर्षातील विद्यार्थी उत्पादित अळंबीवर प्रक्रिया करत त्यापासून बिस्किट, लोणचे, पावडर आदी पदार्थ बनवित आहे. तसेच याची यशस्वी विक्री देखील करत आहेत.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी या प्रकल्पास भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुकही केले. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी प्रा. संग्राम ढेरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.



