
खेड : तालुक्यातील पिरलोटे येथील दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि गावठाणवाडी येथील नळांना रासायनिक सांडपाणी मिश्रित पिवळ्या रंगाचे पाणी आल्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. ही घटना काल (२२ एप्रिल) रोजी सकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.
लोटे पंचक्रोशीतील बहुतांश गावांना एमआयडीसी कडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या अनेक ठिकाणी फुटलेल्या असून त्यामध्ये अनेकदा रासायनिक सांडपाणी किंवा पावसाचे पाणी मिसळते. अशीच घटना बुधवार सकाळी घडली पिरलोटे मधील दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि गावठाणवाडी येथील नळांना हे रासायनिक सांडपाणी मिश्रित पाणी आले. पाण्याचा रंग पिवळा होता. काही ग्रामस्थांनी आणि लहान मुलांनी नकळत हे पाणी प्यायले सुद्धा मात्र त्यांना उग्र आणि विचित्र वास आल्यामुळे तात्काळ इतरांना सांगितले.
ही घटना समजतात गावातील ग्रामस्थ सरपंच चंद्रकांत चाळके, महेश गोवळकर, उदय चाळके संजय चाळके, सचिन चाळके, मंगेश चाळके, रवींद्र गोवळकर आणि इतरही अनेक ग्रामस्थ पिरलोटे येथील एमआयडीसीच्या कार्यालयात धडकले. मात्र सकाळची वेळ असल्यामुळे येथे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. या दरम्यान ज्या ग्रामस्थांनी हे रसायन मिश्रित पाणी नकळत प्यायले होते त्यांपैकी सुमारे दहा ते बारा ग्रामस्थ त्यांना त्रास झाल्यामुळे पीरलोटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले. तात्काळ या ग्रामस्थांनी एमआयडीसीची अधिकारी श्री. हळदणकर तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे (एमपीसीबी) अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले आणि परिस्थितीची माहिती दिली.
रासायनिक सांडपाणी हे सुप्रिया लाइफ सायन्स या कारखान्याचेच आहे, असा आरोप या ग्रामस्थांनी केला आणि कारखान्याच्या व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले आणि याबाबत जाब विचारला. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी ‘ते रासायनिक सांडपाणी आमच्या कारखान्याचेच आहे, असे कबूल केले. मात्र सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये जाणारी वाहिनी गेले तीन-चार महिने तुंबलेली असून त्याबाबत आम्ही वारंवार एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. ती दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी तुंबलेली असल्याने चेंबर ओव्हरफ्लो झाला आणि त्याचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मध्ये मिसळले’ असे सांगण्यात आले. या तीन वाड्यांकडे जाणारी एमआयडीसी ने दिलेली पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी सुद्धा गेले कित्येक दिवस फुटलेली असून त्यातून पाणी वाया जात असते आणि जेव्हा पाणीपुरवठा बंद असतो तेव्हा बाहेरील पाणी या पाईपलाईन मध्ये मिसळले जाते,असेही कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तरीही ‘सामुदायिक सांडपाणी प्रकल्पामध्ये तुमचे सांडपाणी सोडत असाल, तर त्याला सुद्धा काही मापदंड आहेत.हे ओव्हरफ्लो झालेले सांडपाणी या महापदंडांना अनुसरून आहे की नाही, याची तपासणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने करून या कारखान्यावर गुन्हा दाखल करावा आणि नागरी वस्तीला पाणीपुरवठा करणारी स्वतंत्र जलवाहिनी जोडून द्यावी. त्यावर कोणत्याही कारखान्याचे कनेक्शन नसावे, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांमधून केली जात आहे.
याप्रसंगी लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे आणि रत्नागिरी जिल्हा फेडरेशन ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन हे उपस्थित होते.



