पटवर्धन हायस्कूलमध्ये पंचकोशाधारित शिक्षण
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण; संजीवन गुरुकुल प्रकल्पातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य

रत्नागिरी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (२०२०) समावेश केलेली पंचकोष विकसन संकल्पना येथील पटवर्धन हायस्कूललच्या ‘गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुल’ विभागात २००४ पासून राबवली जात आहे. शहरातील पहिले गुरुकुल असलेल्या या शाळेतून आजवर शेकडो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले व यशस्वी झाले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्यांची जपणूक होत आहे, अशी माहिती भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे यांनी दिली.
पंचकोष विकसन संकल्पनेनुसार शिक्षण हे केवळ बौद्धिक न राहता शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर विद्यार्थ्यांचा विकास घडवणारे असावे. संजीवन गुरुकुल ही ११ तासांची शाळा असून ती सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत चालते. सकाळच्या सत्रात प्रार्थना, उपासना, सूर्यनमस्कार आदी उपक्रम राबवले जातात. दुपारी दैनंदिन अध्यापन व स्वयंअध्ययन, तर सायंकाळच्या सत्रात विविध कला, कौशल्ये आणि मैदानी खेळांचा समावेश असतो.
मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर म्हणाल्या की, गुरुकुलची वैशिष्ट्ये म्हणजे सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि पंचकोश विकासाचा अभिनव प्रयोग. व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार, मैदानी खेळ, मल्लखांब, सायकल सहल, मातृभूमी परिचय शिबिर, भातलावणी, वर्षासहली, उद्यमशीलता विकसनासाठी राखी, दिनदर्शिका, भाजी व उटणे विक्री या सारखे उपक्रम घेतले जातात. जलतरण तलावावर पोहण्याचे प्रशिक्षण, संवाद कौशल्यासाठी व्यक्तिपरिचय व क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते.
या प्रसंगी भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह धनेश रायकर, विश्वस्त चंद्रकांत घवाळी, गुरुकुल विभाग प्रमुख सौ. मनाली नाईक, माजी प्रमुख मनोज जाधव उपस्थित होते.



