मुख्य बातमी

नवीन काही शिकायचे असेल तर स्वत:च्या आतले सर्जनशील मुल कायम जागे ठेवा : नीलेश पवार

'साहित्यप्रेमी'च्या 'रंग-संवाद'मध्ये प्रतिपादन

सिंधुदुर्गनगरी : “प्रत्येकाच्या आत एक लहान मुल दडलेले असते. नवीन काही शिकायचे असेल तर स्वत:च्या आतले हे मुल जागे ठेवा. कारण लहान मुल हे सतत प्रश्न विचारणारे, कुतुहल जिवंत असलेले आणि सर्जनशील असते,” असे प्रतिपादन रंगकर्मी, अभिनेता, निवेदक नीलेश पवार यांनी येथे केले.

‘घुंगुरकाठी’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या ‘रंग-संवाद’ या चौदाव्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. पवार यांनी एक तासाहून अधिक काळ रसिकांशी थेट संवाद साधत नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि सादरीकरण यावर अनेक बारकाव्यांसह भाष्य केले. या उपक्रमाचे समन्वयक सतीश लळीत यांनी श्री. पवार यांचा शाल, गुलाबपुष्प आणि ग्रंथभेट देऊन सत्कार केला. पुरुषोत्तम लाडू कदम यांनी श्री. पवार यांचा परिचय करून दिला. लेखन आणि अभिनयाबरोबर निवेदन, सूत्रसंचालन, डबिंग, समालोचन, मुलाखतींचे संचालन अशा अनेक क्षेत्रात श्री. पवार यांनी केलेल्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला.

श्री. पवार यांनी नाटकाच्या लेखनापासून ते रंगमंचावर सादर होईपर्यंतच्या सर्व टप्प्यांची सविस्तर माहिती दिली आणि लेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्मितीमध्ये सहभागी असलेले सर्व घटक आणि रसिक यांचा परस्परसंबंध उलगडून सांगितला. ते म्हणाले की, रसिक हासुद्धा उत्कृष्ट कलाकार असतो. रसिकाशिवाय कलाकार अपूर्ण असतो. रंगमंचावरील प्रसंग, संवाद, नेपथ्य आणि अभिनय यातून निर्माण होणारी रसनिर्मिती हा सामुहिक अनुभव असतो. रंगमंचावर सादर होणारे नाटक आहे, ते खोटे आहे, हे कलाकार आणि रसिक या दोघांनाही माहिती असते. पण खरे वाटावे, असे हे खोटे असते. हीच नाटकाची गंमत आहे. म्हणुनच नाटकाला समुहकला म्हटले जाते.

नाटकाच्या प्रयोजनाबद्दल श्री. पवार म्हणाले की, करमणुक किंवा मनोरंजन हा नाटकाचा केवळ एक उद्देश आहे. नाटकाने प्रेक्षकाला विचारप्रवृत्त केले पाहिजे, समाजभान दिले पाहिजे. नाट्यकला ही विचारांची आंघोळ आहे. किमान प्रायोगिक नाटकातून तरी हा उद्देश पूर्ण झाला पाहिजे. अलिकडच्या अनेक प्रायोगिक नाटकातून तो पूर्ण होताना दिसतो. प्रायोगिक नाटक हे समजायला कठीण, दुर्बोध असलेच पाहिजे असे नाही. मात्र ते समाजातील मोतीबिंदु दाखवणारे असावे. प्रायोगिक नाटकातील संकेत, सुचकता प्रेक्षकांनीही समजून घेतली पाहिजे. संवादाबरोबरच वेशभुषा, नेपथ्य, प्रकाश याचीही भाषा असते. प्रेक्षकांनी ती समजून घ्यायचा प्रयत्न केला तर प्रायोगिक नाटक दुर्बोध वाटणार नाही.

चवथीत असताना आयुष्यातील पहिले नाटक अपघाताने केले. शाळेतील नाटकाच्या ऑडिशन कशा असतात ते कुतुहलापोटी पहायला गेलेल्या मला शिक्षकांनी ऑडिशन द्यायला सांगितले. नव्वद मुलांमधुन दहाजण निवडायचे होते. दुसऱ्या दिवशी यादीत पहिले नाव माझे लागले, अशी आठवण त्यांनी सागितली. अभिनय करताना अनेकांचे आयुष्य उधार घ्यावे लागते. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा जगता येतात व स्वत:ला समृद्ध करता येते, असे ते म्हणाले. ‘रंग-संवाद’ या संकल्पनेचे कौतुक करताना ते म्हणाले की, रसिक आणि कलाकार यांना एकमेकांना समजून घेण्याच्यादृष्टीने हा अतिशय उपयुक्त कार्यक्रम आहे. वाद, संवाद, सुसंवाद आणि सुखसंवाद याचा फायदा दोघांनाही होईल.

प्रास्ताविकात सतीश लळीत यांनी मराठी रंगभूमीचा थोडक्यात आढावा घेतला. भरतमुनींचे नाट्यशास्त्र, मराठी विष्णुदास भावे यांच्यापासुन सुरु झालेली समृद्ध मराठी नाट्यपरंपरा, मराठी माणसाचे नाट्यवेड, कोकणातील दशावतारसारखी लोकरंगभूमी, गावागावात सादर होणारी सामाजिक नाटकांची परंपरा, एकांकिका स्पर्धा याचा परामर्ष त्यांनी घेतला. कलाकार आणि रसिक यांनी एकमेकांना समजून घ्यावे, नाटक पहाण्याचा अनुभव समृद्ध कसा करता येईल, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सागितले. कवयित्री डॉ. सई लळीत यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!