कळसवली ग्रामपंचायतीचा ‘हायटेक’ प्रयोग
क्यूआर कोडद्वारे घरबसल्या कर भरण्याची सुविधा

राजापूर : बदलत्या काळानुसार ग्रामपंचायतींचा कारभारही आता हायटेक होत असून पारदर्शकतेसाठी विविध नवे प्रयोग राबवले जात आहेत. राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी पूर्णपणे ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देत अनोखी पुढाकार घेतला आहे. घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू करण्यात आली असून अशी सुविधा देणारी कळसवली ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून आदर्शवत कामगिरी करणाऱ्या कळसवली ग्रामपंचायतीने यापूर्वी ‘आर. आर. पाटील सुंदर गाव’ स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला होता. आता ग्रामस्थांना घरबसल्या डिजिटल सेवा उपलब्ध करून देत ग्रामपंचायतीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना क्यूआर कोड स्कॅन करून घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून संबंधित घरमालकाच्या नावाने स्वतंत्र क्यूआर कोड तयार करण्यात आला असून तो घरावर स्टिकरच्या स्वरूपात लावण्यात आला आहे. यासाठी विशेष सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. ‘स्कॅन करा आणि कर भरा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली आहे.
या सुविधेमुळे ग्रामस्थांना कर भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. थेट क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. गावाचा विस्तार होत असतानाही तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक कुटुंबाला सोयीस्कर पद्धतीने कर भरणे शक्य होणार आहे.
याशिवाय, या डिजिटल प्रणालीमध्ये मालमत्ता क्रमांक, मालकाचे नाव, भोगवटदाराचे नाव तसेच मालमत्तेचा फोटो यासारखी माहिती उपलब्ध होणार आहे. नागरिकांना भरलेला व शिल्लक कर याचा तपशीलही पाहता येणार आहे. तसेच जन्म, मृत्यू, विवाह व ‘ना हरकत’ दाखल्यांसह विविध प्रमाणपत्रेही क्यूआर कोडच्या माध्यमातून मिळवता येणार आहेत.
या उपक्रमामुळे कळसवली गावातील ग्रामस्थांना घरबसल्या विविध शासकीय सेवा उपलब्ध होणार असून ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणि सुलभता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.



