बंदरातील नौकांचे सांगाडे, अवशेष नौकामालकांनी हटवण्याचे आदेश

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरात असलेले नौकांचे सांगाडे, अवशेष नौकामालकांनी हटवण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मिरकरवाडा मत्स्य बंदरात बंद, विनावापर, मोडलेल्या स्थितीत असलेल्या, बुडालेल्या व नष्ट झालेल्या नौकांचे इंजिन व इतर पार्ट्स काढून घेऊन कोणतेही मूल्य न येणारे असे नौकांचे सांगाडे/ अवशेष बंदरात सोडून दिलेले आहेत. यामुळे नौकानयनासाठी अडथळा होत आहे. बंदरातील जागा अनावश्यकरित्या व्यापली गेली आहे. हा अडथळा मच्छीमारी नौकांसाठी धोकादायक झाला आहे.
त्यामुळे अशा स्थितीत असलेल्या नौका, सांगाडे, अवशेष संबंधित नौकामालकांनी ८ मे पर्यंत बंदरातून स्वखर्चाने काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा या नौका मत्स्यव्यवसाय विभागामार्फत काढून टाकण्यात येतील व संबंधित नौकामालकांना कोणत्याही नुकसान भरपाईचा दावा करता येणार नाही व होणाऱ्या कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घेण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी दिल्या आहेत.



