चिपळुणातील १६ वर्षीय मुलाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू

राधानगरी (कोल्हापूर) : चिपळूण तालुक्यातील ओवळी येथील १६ वर्षीय मुलाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राधानगरी तालुक्यात घडली. स्वराज्य संदीप शिंदे असे मृत मुलाचे नाव असून, तो सध्या शिक्षणासाठी पुण्यातील इंद्रायणीनगर, भोसरी येथे वास्तव्यास होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा संपल्यानंतर स्वराज्य हा कोल्हापूरमधील कळंबा येथे आपल्या मामाकडे उन्हाळी सुट्टीसाठी आला होता. बुधवारी तो मामा ओंकार पाटील व त्यांच्या मित्रांसोबत काळमावाडी धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी सर्वजण दूधगंगा नदीत पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल डोहात बुडाला.
तो बराच वेळ पाण्याबाहेर न आल्याने सोबतच्या लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांत नोंद करण्यात आली. रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली होती.
गुरुवारी सकाळी स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. सकाळी सुमारे १० वाजता डोहातून स्वराज्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
स्वराज्य हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील दुबई येथे नोकरीस असून, त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे ओवळी, चिपळूण व राधानगरी परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतदेहाचे राधानगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, पुढील तपास राधानगरी पोलीस करत आहेत.


