मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

तोंडली-धनगरवाडी सौरदिव्यांनी उजळली

रत्नागिरी : जिल्ह्यातील तोंडली धनगरवाडी या दुर्गम व जंगल परिसरातील गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून सौरदिवे बसविण्यात येत गाव उजळून निघाले आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेत आणि दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळाला आहे.

दाट जंगल परिसरात वसलेल्या या गावात हिंस्र वन्य प्राण्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे गैरसोयीचे ठरत होते. शेतीकाम व जनावरांची देखभाल यावरही याचा परिणाम होत होता. गावातील ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत राष्ट्रीय सेवा योजना व डीबीजे कॉलेज यांनी सामाजिक बांधिलकी जपत सौरदिवे बसविण्याचा उपक्रम राबविला. या अंतर्गत गावातील विविध ठिकाणी सौरदिवे उभारण्यात आले आहेत.

या उपक्रमासाठी गावातील मनोहर रामचंद्र कोकाटे यांनी पुढाकार घेत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा उपक्रम साकार झाला, असे ग्रामस्थांनी नमूद केले.

सौरदिव्यांमुळे गावकऱ्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून लहान मुलांना अभ्यासासाठी योग्य वातावरण, महिलांना व ज्येष्ठांना निर्धास्तपणे वावरण्याची सुविधा मिळाली आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या हालचालींवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासही मदत होत आहे.

कार्यक्रमाच्या वेळी उपप्राचार्य स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ. सुजाता खोत, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, माजी एनएसएस कार्यक्रम अधिकारी अरुण जाधव तसेच कार्यक्रम अधिकारी अविनाश पालशेतकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी एनएसएस स्वयंसेवकांनी गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत सौरदिव्यांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाल्याचेही नमूद करण्यात आले. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत एनएसएस व महाविद्यालय प्रशासनाचे तसेच मनोहर कोकाटे यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!