रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची प्रक्षेत्र भेट
मत्स्यव्यवसाय विकासावर चर्चा

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र, झाडगाव येथे ७ मे रोजी दापोली येथील १६ पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी विशेष प्रक्षेत्र भेट दिली. दक्षिण कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय आणि संशोधन कार्याची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. के. जे. चौधरी यांनी सर्व पत्रकारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना महाराष्ट्रातील, विशेषतः दक्षिण कोकण किनारपट्टीच्या मत्स्यव्यवसाय विकासामध्ये ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. मत्स्य संवर्धन, सागरी जीवांचे जतन आणि मच्छिमारांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. शेवटी त्यांनी संशोधन केंद्राच्या ‘मत्स्यालय व मत्स्य-संग्रहालय’ तसेच ‘जलपर्यटन (नौकानयन)’ प्रकल्पांना भेट देऊन माहिती घेतली.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. एस. डी. देसाई यांनी या संपूर्ण दौऱ्याचे नेटके नियोजन आणि नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांनी केंद्रातील विविध विभागांना भेटी दिल्या. या भेटीमुळे विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञान सामान्य मच्छिमार व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. या दौऱ्याबद्दल पत्रकारांनी समाधान व्यक्त केले असून, कृषी आणि मत्स्य क्षेत्रातील नवनवीन प्रयोग समाजासमोर आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. आसिफ पागारकर, अभिरक्षक डॉ. हरीश धमगये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. सचिन साटम, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीम. व्ही. आर. सदावर्ते, श्रीम. ए. एन. सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.



