मुख्य बातमी

हातखंबा-पाली भागात दुसऱ्या दिवशीही तुफान वारा

पावसाच्या शिडकाव्याने उकाड्यातून दिलासा

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा-पाली परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानंतर शनिवारी दुपारनंतर पुन्हा एकदा आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आणि परिसरात तुफान वाऱ्याचा जोर वाढल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सुसाट वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रस्त्यांवरील धूळ, कचरा आणि पालापाचोळा हवेत उडताना दिसत होता. काही ठिकाणी दृश्यमानताही कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. वादळी वातावरणानंतर सायंकाळच्या सुमारास पावसाच्या मोठ्या थेंबांनी हजेरी लावत सुमारे पंधरा ते वीस मिनिटे हलका ते मध्यम स्वरूपाचा शिडकावा केला. या पावसामुळे दिवसभर जाणवत असलेल्या उकाड्यातून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने वातावरणात लक्षणीय गारवा निर्माण झाला असून परिसरातील हवामान आल्हाददायक बनले आहे. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांनी या बदललेल्या वातावरणाचा आनंद घेत आहे. दरम्यान, हवामानातील या अचानक बदलामुळे पुढील काही दिवसांतही पावसाळ्यापूर्वीच्या वादळी सरींची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अचानक झालेल्या पावसाच्या हलक्या शिडकाव्याने जंगल भागातील झाडेही अक्षरशः सुखावून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसभराच्या कडक उन्हाने कोमेजलेली पाने पावसाच्या थेंबांनी पुन्हा ताजीतवानी झाली आहे. सुसाट वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे झाडांच्या फांद्या डोलू लागल्या, तर पानांच्या सळसळीने संपूर्ण वातावरणात निसर्गमय प्रसन्नता पसरली. उष्णतेने त्रस्त झालेल्या वातावरणाला या शिडकाव्याने दिलासा मिळाला असून हिरवाईनेही नवचैतन्य अनुभवले आहे.

दरम्यान, पावसानंतर निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणात पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसराला आणखीच मोहक स्वरूप प्राप्त झाले आहे. झाडांच्या फांद्यांवर विसावलेल्या पक्ष्यांच्या मधुर स्वरांनी निसर्गात जणू नवचैतन्य संचारल्याची अनुभूती आली आहे. सुसाट वाऱ्याच्या झुळुकांसह ऐकू येणारा हा किलबिलाट वातावरणाला वेगळीच धून देत असून उकाड्याने त्रस्त झालेल्या वातावरणात निसर्गाच्या या सुरेल मैफलीने मनालाही सुखद दिलासा मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!