नवनिर्माण महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती विविध उपक्रमांनी साजरी

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी केली.
सर्वप्रथम नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. पौर्णिमा सरदेसाई यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात अकरावी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी गायलेल्या महात्मा गांधींच्या भजनाने करण्यात आली. सुरेल आवाजातील भजनाने सभागृह मंत्रमुग्ध होऊन गेले.
दरम्यान या कार्यक्रमात अकरावी विज्ञान शाखेतील अंजल कृष्णा व्ही, तुषार सचिन पाटील, श्वेता पाटील, नाजिश अलजी मेहिश काद्री, श्रीनिवास गाड्री, तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील तन्वी कळंबटे, आयेशा सावकार आणि अजिंक्य चव्हाण या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्रचार डॉ. गवाळे यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमादरम्यान प्रा. सुकुमार शिंदे यांनी स्वच्छतेचे शपथ वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी व्यक्त केले.
या दिनाच्या औचित्य साधून महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी, विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी महाविद्यालयाच्या आवाराची साफसफाई केली आणि आपले काम आपली स्वच्छता आपल्या कार्यालयाची स्वच्छता आपणच राखली पाहिजे, असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमेरा काद्री, तर कार्यक्रमाचे आभार प्रा. सुशील साळवी यांनी मानले.



