मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर ४ ऑक्टोबर रोजी‘अनुभव हाच गुरु’ नाटिकेचे प्रसारण

संगमेश्वर तालुक्यातील जि. प. शाळा आंबवपोंक्षेच्या बालकलाकारांची आकाशवाणीवर पहिलीच भरारी

संगमेश्वर/रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘बालजगत’ या लोकप्रिय कार्यक्रमात संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, आंबवपोंक्षे येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘अनुभव हाच गुरु’ ही उद्बोधक नाटिका प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होईल.

ग्रामीण भागातील या गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रथमच आकाशवाणीच्या माध्यमातून सादरीकरण केले असून, आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अतिशय उत्तम व प्रभावी कलाविष्कार घडवून आणला आहे. या नाटिकेत घरात आजी-आजोबांचे असणे किती गरजेचे आहे, त्यांच्या मायेच्या सावलीत नातवंडांचे भावविश्व कसे समृद्ध होते आणि त्यांच्याकडून जीवनाचे कोणते महत्त्वाचे संस्कार मिळतात, याचे हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले आहे. यासोबतच आजच्या धावपळीच्या युगातील सोशल मीडियाचा वाढता वापर, त्याचे फायदे आणि तोटे याविषयीही या चिमुकल्यांनी अत्यंत रंजक व विचार करायला लावणारी मांडणी केली आहे.

नाटिकेचे लेखन व मार्गदर्शन सौ. मधुरा रामदास तेटांबे आणि सौ. सविता प्रकाश पोंक्षे यांनी केले असून, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची समीर पाटणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या नाटिकेत शौर्य प्रकाश कदम, स्वरा मनोज भुवड, मार्वी सदाशिव जोगले, तन्वी प्रकाश कदम, साईशा अमोल नेटके आणि सार्थक मयूर सुतार या बालकलाकारांनी विविध भूमिका वठवल्या आहेत. बालकलाकार गौरांग जितेंद्र गुरव याने ढोलकीची उत्कृष्ट साथ दिली असून, श्रीकृष्ण सचिन साठे याने बाल निवेदकाची भूमिका पार पाडली आहे. कार्यक्रमाचे आकाशवाणी निवेदन सोनाली कानिटकर यांचे असून, या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत.

हे प्रसारण ११४३ किलोहर्ट्झ (मध्यमलहरी) आणि १०१.५ मेगाहर्ट्झ या एफ.एम. वाहिनीवर तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ (Newsonair) या मोबाईल ॲपवर ऐकू येणार आहे. याशिवाय, हे प्रसारण झाल्यानंतर आकाशवाणी रत्नागिरीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर (@airratnagiri1248) हा कार्यक्रम ऐकण्यासाठी उपलब्ध होईल.

संगमेश्वर तालुक्यातील या ग्रामीण बालकलाकारांच्या पहिल्याच आकाशवाणी सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक होत असून, जास्तीत जास्त श्रोत्यांनी हा कार्यक्रम ऐकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!