मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

नातूनगर धरणाजवळ झायलोची उभ्या एलपीजी गॅस टँकरला धडक; महिला ठार

खेड : मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या झायलो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरला जोरदार धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली, तर दोन लहान मुलांसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर धरण परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे ५.४० वाजण्याच्या सुमारास घडली. यात सबिया मारुख जसनाईक (वय ३३, रा. भोस्ते मोहल्ला) यांचा जागीच मृत्यू झाला, तर इमरान मुरात जसनाईक (वय ४५), अब्दुल अच्चीस जसनाईक (वय ४) आणि सेहरा मारुख जसनाईक (वय ७) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी भरणे येथील यश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार झायलो (क्र. एमएच-०८-झेड-३६९२) या वाहनावरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्गालगत उभ्या असलेल्या गॅस कंटेनरवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर भरणे नाका ब्रिजखाली सेवेत असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धामची विनामूल्य रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. तसेच जय हिंद ॲम्बुलन्स, खेड आणि १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर, प्रमोद जाधव व इतरांनी मदतकार्यात सहभाग घेतला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!