मिरकरवाड्यात विक्रेत्याकडून मुलाला मारहाण

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरकरवाडा परिसरात आज (१ एप्रिल) दुपारी एका मुलाला एका किरकोळ विक्रेत्याकडून मारहाण करण्यात आली. अर्जुन उमेश चव्हाण (वय १८) असे त्या मुलाचे नाव आहे. त्या मुलाने आपल्या भावाला मदतीला बोलवल्यानंतर मिरकरवाड्यात विक्रेत्यासोबत मोठा जमाव जमा झाला आणि त्यांनी मुलाच्या मदतीला आलेल्या लोकांनाही मारहाण केली. आमच्या गाडीवर हिंदू लिहिले म्हणून आम्हाला मारहाण झाली असल्याचा आरोप जखमी मुलाच्या भावाने केला आहे.

मिरकरवाड्यात मच्छी आणायला गेलेल्या मुलाकडे अर्जुन चव्हाण हा एका विक्रेत्याकडे पिशवी खरेदी करायला गेला. सुट्टे पैसे नसल्याने त्याने स्कॅनर मागितला. त्यावेळी तो स्कॅनर बंद असल्याचे लक्षात आले, असे त्या मुलाने विक्रेत्याला सांगितल्यानंतर विक्रेत्याने “अब मेरे मुह पे छाप” अस उर्मट उत्तर दिले.

यावर मला तुमची पिशवी नको, असे सांगून अर्जुन दुसऱ्या दुकानात जात होता त्यावेळी त्या मुलाला पुन्हा विक्रेत्याने बोलावले आणि तो मारहाण करू लागला. यावेळी अर्जुनने त्याचा भाऊ करण याला बोलावले.

करण आणि त्याच्यासोबत दोघे तिघेजण तिथे पोहोचले. यावेळी अनेकांची गर्दी जमली होती. त्यांनी अर्जुनसह त्याचा भाऊ आणि सहकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात अर्जुन जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही गोष्ट समजल्यानंतर हिंदू संघटनांचे पदाधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. तर शहर पोलिसांची अर्जुनचा जबाब नोंदवला आहे.


