मुख्य बातमी

रत्नागिरी-सातारा अंतर ५० किलोमीटरने कमी करणाऱ्या पुलाचे लवकरच उद्घाटन

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांच्यातील अंतर आता ५० किलोमीटरने कमी होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या केबल स्टेड पुलाचे काम पूर्ण झाले असून पावसाळ्यानंतर हा पूल लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच या पुलाच्या कामाची पाहणी केली.

हा प्रकल्प १७५ कोटी रुपये खर्चाचा असून मुंबईतील वरळी सागरी सेतूप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचा केबल स्टेड पूल प्रथमच उभारला जात आहे. तापोळा ते कोकणच्या दिशेला गाढवली आहिर असा हा पूल उभारण्यात आला आहे. ५४० मीटर लांब आणि १४ मीटर रुंद असलेल्या या पुलाच्या मध्यभागी ४३ मीटर उंचीची व्ह्यू गॅलरीही उभारण्यात आली आहे. या गॅलरीत जाण्यासाठी कॅप्सुल लिफ्टची सुविधा असेल. तसेच दोन्ही बाजूंनी जिन्याचे मार्गही असतील. या प्रकल्पाचे काम एल ॲण्ड टी कंपनीने केले आहे.

पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा आंबेनळी घाट मार्ग वाचणार आहे. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाट मार्ग या नव्या पुलावरून पलीकडे तापोळा मार्गे महाबळेश्वर व तापोळा कासमार्गे सातारा येथे जाता येणार आहे. त्यामुळे जवळपास ५० किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे.

पुलावरील व्ह्यू गॅलरीमुळे कोयना धरणातील बॅकवॉटर आणि सूर्योदय तसेच सूर्यास्त यांचे विलोभनीय दृश्य पर्यटकांना पाहता येणार आहे.

एकनाथ शिंदे यांचे गाव असलेले सातारा जिल्ह्यातील दरे हे गाव ते कोयना खोऱ्यातील बामणोली गाव यांना जोडणारा आणखी एक ३०० कोटी रुपये खर्चाचा पूल उभारण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, कांदाटी खोऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना या पुलाचा मोठा उपयोग होणार आहे. पावसाळ्यात धोकादायक ठरणारा कोयना बॅकवॉटरमधील बार्जचा प्रवासही या पुलामुळे टाळता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!