सामायिक जमिनीच्या वादातून विवाहितेला शिवीगाळ

लांजा : सामायिक जमिनीच्या जुन्या वादातून विवाहितेला शिवीगाळ, अश्लील हावभाव तसेच धमकी दिल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास साटवली भंडारवाडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रांजल प्रसाद चव्हाण (वय ३८, रा. साटवली भंडारवाडी) आणि संबंधित आरोपी हे नात्याने चुलत सून, सासू, सासरे व दीर असून त्यांच्यात सामायिक जमिनीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे.
घटनेच्या दिवशी प्रांजल चव्हाण यांच्या घरातील सर्वजण अंगणात बसलेले असताना मारुती यशवंत चव्हाण यांना सुरेश यशवंत चव्हाण, सुनिता सुरेश चव्हाण व जितेंद्र सुरेश चव्हाण यांनी हाताने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर जितेंद्र चव्हाण यांनी प्रांजल चव्हाण यांना ढकलून देत मनात लज्जा निर्माण होईल असे अश्लील हावभाव केले. तसेच शिवीगाळ करत “तुझ्या नवऱ्याला कसे अडकवतो बघ” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
प्रांजल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून लांजा पोलिसांनी जितेंद्र चव्हाण यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७९, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नासिर नावळेकर करत आहेत.



