मुख्य बातमी

मतदारयादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२४ नुसार व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम २१ नुसार १४ मेच्या पत्रान्वये राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ३० जून ते २९ जुलै या कालावधीत घरोघरी भेट देवून मतदार यादी तयार करण्यासाठी प्रगणन फॉर्म भरून घेणार आहेत. या कार्यक्रमातंर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरणही करण्यात येणार आहे. मतदार यादी तयार करण्याचा अर्हता दिनांक १ ऑक्टोबर असून या तारखेस पात्र मतदार आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकणार आहेत. मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी ५ ऑगस्ट रोजी होणार असून प्राप्त दावे, हरकतींवर निर्णय घेवून अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्धी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले प्रगणन फॉर्म वेळेवर भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत. या प्राथमिक टप्प्यामध्ये कोणतेही कागदपत्र जमा करण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यातील पाच विधानसभा संघातील पात्र मतदारांनी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) च्या मोहिमेस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

विशेष सखोल पुनरिक्षणाचा तपशिलवार कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. विशेष सखोल पुनरीक्षणासाठी अर्हता दिनांक १ ऑक्टोबर. तयारी, प्रशिक्षण व छपाई २० जून ते २९ जून. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेटी ३० जून ते २९ जुलै. मतदान केंद्रांचे सुसू‌त्रीकरण २९ जुलै पर्यंत. प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी ५ ऑगस्ट. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर. नोटीस टप्पा / दावे व हरकती निकालात काढणे ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर. अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी ७ ऑक्टोबर.

राज्यात मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम १ जानेवारी २००२ या अर्हता दिनांकावर राबविण्यात आला होता व अंतिम मतदार यादी ३ डिसेंबर २००२ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.

मतदारांना सध्याच्या व सन २००२ च्या मतदार यादीमध्ये स्वतःचे नाव खालीलप्रकारे शोधात येईल. सध्याच्या मतदारयादीतील नाव शोधण्यासाठी http://www.eci.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या किंवा ECINET हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा Search Your Name in E-Roll/Voter List या टॅबवर क्लिक करा.

२००२ च्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://www.eci.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. किंवा ECINET हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा. Search Your Name in Last SIR या टॅबवर क्लिक करा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या प्रत्यक्ष घरांना भेटी

जिल्हयामध्ये विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यात जिल्हयातील एकूण १ हजार ७४७ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत सुमारे १३ लाख ३७ हजार ८६६ मतदारांच्या तपशिलाची खातरजमा करण्यात येणार आहे. हे बीएलओ ३० जून ते २९ जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले ‘मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) त्यांना सहकार्य करणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादीतून दुबार नावे तसेच मृत व्यक्तीची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक, सर्वसमावेशक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!