मुख्य बातमी

पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथच्या चैत्रोत्सवास उद्यापासून प्रारंभ

सहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल 

रत्नागिरी : तालुक्यातील पाली-पाथरटचे ग्रामदैवत व कोकणातील प्रसिद्ध पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा २९ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत मुख्य मंदिरामध्ये पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पालीतील मुख्य मंदिरात राज्यासह देशविदेशातील भाविक हजेरी लावून, श्रींची सेवा करीत असतात. उत्सव काळात दररोज धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. याची नियोजन सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई, मानकरी गुरुराज सावंत, अनंत पालकर, प्रदीप घडशी, बबन काजरेकर, सुभाष गराटे, चंद्रकांत गुडेकर, विष्णू माईण, रोहित पांचाळ, अनिल धाडवे, गुरुदास धाडवे व पाली-पाथरटमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावर्षीचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा चैत्र शु.११ ते चैत्र वद्य १ शके १९४८ दिनांक २९ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत संपन्न होणार असून चैत्रोत्सवाची सेवा समस्त सतीश नवाथे (अंबरनाथ) हे करीत आहेत. उत्सव काळात दररोज सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत वैयक्तिक पूजा, अभिषेक, एकादष्णी, लघुरूद्र, महारूद्र, यज्ञयागादी कर्मे आदी धार्मिक कार्यक्रम होतील. त्यानंतर दुपारी १२.३० ते १ वाजेपर्यंत नैवेद्य, आरती व मंत्रपुष्प, दुपारी १ ते २.३० वा.पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७.३० वाजेपर्यंत रूपे लावणे व धुपारती व रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत आरती, मंत्रपुष्पांजली व नामजप, रात्री ९ ते ९.३० वा. प्रसाद असे नित्य कार्यक्रम होतील.

चैत्रउत्सवात २९ मार्च रोजी रात्री ९.३० ते १०.३० वाजेपर्यंत मंत्रजागर, १०.३० ते १२ वाजेपर्यंत कीर्तन, १२ वाजता पालखी प्रदक्षिणा व छबिना, ३० मार्च रोजी रात्री ९ ते १० यावेळेत स्थानिक भजन, १० ते १२ यावेळेत कीर्तन, कीर्तनकार ह.भ.प. अमृता नवाथे (जावडे, लांजा) १२ वा. पालखी प्रदक्षिणा व छबिना, ३१ मार्च रोजी सायंकाळी. ६.४५ वाजता दीपोत्सव कार्यक्रम, रात्री ९ ते १०.३० यावेळेत घरामध्ये वास्तुशास्त्र कसे वापरावे सादरकर्ते श्री नाटेकर (पुणे), रात्री १०.३० ते १२ वा. कीर्तन १२ वाजल्यानंतर पालखी प्रदक्षिणा व छबिना.

बुधवार १ एप्रिल रात्री ९ ते १०:३० भजन श्री विश्वकर्मा भजन मंडळ (आंबव सुतारवाडी, बुवा- नंदकुमार पांचाळ), रात्री १०.३० ते १२ वाजेपर्यंत कीर्तन, १२ वाजल्यानंतर पालखी प्रदक्षिणा व छबिना. २ एप्रिल रोजी रात्री ९.३० ते १०.३० वाजेपर्यंत आरती, मंत्रपुष्पांजली व नामजप, १०.३० ते १ वाजेपर्यंत स्वरनिहाली, अभंग व नाट्यसंगीत सादरकर्ते निहाली गद्रेठाकूर (गोवा), रात्री १ ते ३.३० वाजेपर्यंत पालखी प्रदक्षिणा व छबिना, पहाटे ४ वाजता लळीताचे कीर्तन कीर्तनकार ह.भ.प. विश्वनाथबुवा भाट्ये उमरे (रत्नागिरी). ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता श्री लक्ष्मीपल्लिनाथ नाट्यमंडळ, पाली निर्मित अनिल काकडे लिखित दोन अंकी नाटक “फायनल डिसीजन”चा प्रयोग होईल.

सर्व भक्तांनी चैत्रोत्सव पर्वात मंदिरामध्ये येऊन धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानचे मुख्य मानकरी व अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!