मुख्य बातमी

कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी उत्साहात

रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर या शाळेमध्ये वारकरी दिंडीचा कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. विठ्ठल रुक्मिणीसोबतच पारंपरिक वारकरी वेशभूषेत विद्यार्थी सजून आले होते.

या दिंडीत विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग होता. विठ्ठल नामाचा गजर करत, टाळ मृदुंगाच्या तालावर अभंग आणि भजने गात शालेय परिसरातून दिंडी काढण्यात आली होती. “टाळ वाजे मृदंग वाजे, वाजतो हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा! अशा विठ्ठल नामाच्या गजरात सारा आसमंत दुमदुमून गेला होता. फुगड्या, रिंगण, विविध पारंपारिक खेळ खेळून विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद अनुभवला. वर्गावर्गांमध्येही अभंग, गाण्याच्या तालावर वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी फेर धरला होता. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची माहिती आणि विठ्ठल भक्तीची शिकवण याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रसाद देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.

यानिमित्ताने मुलांमध्ये भक्तीभाव, सामाजिक समता आणि सांस्कृतिक परंपरा जतन करण्याची जाणीव जागृती झाली. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सौ. राजेशिर्के, पांचाळ व शिक्षक ऐवळे, मोरे, गार्डी, सूर्यवंशी, वेदरे, घाणेकर, भोरे, औघडे, फुटक, पाडावे यांनी हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडण्यासाठी मेहनत घेतली. र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!