राजापूर तालुक्यात प्रधानमंत्री घरकुल योजनेला वेग ; २ हजार ४५७ घरांना मंजुरी

राजापूर : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना राजापूर तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून, योजनेअंतर्गत तालुक्यातील २ हजार ४५७ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर घरांच्या बांधकामांना सध्या वेगाने सुरुवात झाली असून अनेक लाभार्थ्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे, अशी माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली.
बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित आणि पक्के घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री घरकुल आवास योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेद्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. राजापूर तालुक्यात पंचायत समितीमार्फत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नियमित १ लाख २० हजार रुपये अनुदान देण्यात येते. त्यासोबतच वाढीव ५० हजार रुपयांची मदत मिळून एकूण १ लाख ७० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
तालुक्यात मंजूर झालेल्या २ हजार ४५७ घरांपैकी २ हजार २९६ घरांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. त्याचबरोबर १ हजार ३७८ घरांना दुसरा हप्ता, ५०३ घरांना तिसरा हप्ता तर ३० घरांना चौथा हप्ता वितरित करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाने दिली.
या योजनेमुळे तालुक्यातील अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि बेघर कुटुंबांना दिलासा मिळाला असून, स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. तसेच घरबांधणीच्या कामांमुळे ग्रामीण भागात विकासकामांनाही चालना मिळत आहे.



